Thursday, September 19, 2024
Homeनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

- Advertisement -

देवळा । प्रतिनिधी Deola

तालुक्यातील भऊर येथे विवाह सोहळ्यासाठी बहिणीकडे आलेल्या भूषण पिराजी वाघ (वय २५, मुलूखवाडी ता. देवळा) या तरूणावर बिबट्याने हल्ला चढवला. भुषणने बिबट्यास प्रतिकार करत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढल्याने त्याचे प्राण बचावले.

जखमी झालेल्या भूषणवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलूखवाडी येथील भूषण पिराजी वाघ हा तरूण भाचीच्या लग्नासाठी भऊर येथे आला होता. सकाळी सहा वाजेच्यासुमारास तो प्रातः विधीसाठी गेला असता तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने भुषणवर हल्ला केला. मात्र न डगमगता बिबट्यास प्रतिकार करत भुषणने जोरजोरात आरडाओरड सुरू केल्याने घाबरलेला बिबट्या झाडावर चढून गेला.

आरडाओरड ऐकून माजी सरपंच दादा मोरे, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार, नितीन पवार, सुरेश माळी, बाळा माळी, भूषण मोरे, पिंटू पिंपळसे, मोहन माळी, बाळू माळी, साहेबराव माळी, पुंडलिक मोरे, अतुल मोरे, धनाजी शिंदे आदींसह ग्रामस्थ व युवकांनी घटनास्थळी धाव घेत झाडावर चढलेल्या बिबट्याला हुसकावून लावले व जखमी झालेल्या भूषणला उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळी तालुका वन अधिकारी कौतिक ढोमसे, वनपाल प्रसाद पाटील, सुवर्णा ईकडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला तसेच जखमीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. गिरणा नदीकाठी बिबट्याचे वास्तव्य वाढल्याने पिंजरा लावत त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या