सातपूर | प्रतिनिधी Satpur
बेळगाव ढगा शिवारातील मौजे गट क्रमांक २७४ मधील संतोष कर्डिले यांच्या शेतीमध्ये ट्रॅक्टरद्वारे मशागत करताना लघुशंकेसाठी झाडाझुडपात गेलेल्या एका युवकावर बुधवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याने हल्ला केला. या हल्ल्यात उमेश विश्वनाथ मेढे (२६), असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिली.
मेढे याने सांगितलेल्या वर्णनानुसार व त्याच्या शरीरावरील जखमांवरून एक ते दीड वर्षे वयाचा बछडा असावा, असे ते म्हणाले. युवकाच्या मानेभोवती, दोन्ही खांद्यांवर व पाठीवर बछड्याने पंजा मारल्यामुळे मध्यम ते किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
त्याला तत्काळ जखमी अवस्थेत त्याचा आत्याभाऊ नीलेश दाते यांनी उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रतिबंधात्मक इंजेक्शन व औषधोपचार केल्यानंतर वैद्यकीय सूत्रांनी त्यास घरी सोडल्याचे निर्मळ म्हणाले.
घटनेची माहिती मिळताच सातपूर वनपरिमंडळांतर्गत असलेल्या वनपाल, वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या हल्ल्याची नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयात नोंद करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात या भागात पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या दोन घटनांची माहिती कार्यालयाला प्राप्त झाली होती. वनकर्मचार्यांना परिसरातील मळे भागात गस्त करून शेतकरी, शेतमजुरांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.