अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
किरकोळ कारणातून तरुणाचा खून करणार्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील एस. गोसावी यांनी दोषी धरून सात वर्षे सक्त मजुरी व पाच लाख रुपये मयत तरुणाच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. रामजी विक्रम प्रसाद (वय 25 रा. नागापूर गावठाण, ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सोनू राजू वाघमारे (वय 25 रा. नागापूर) याचा खून केला होता. सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील श्रीमती पुष्पा कापसे – गायके यांनी काम पाहिले.
सुनीता परसू कांबळे यांच्याकडे त्यांच्या बहिणीचा मुलगा सोनू राजू वाघमारे राहत होता. कांबळे यांच्या शेजारी रामजी विक्रम प्रसाद हा त्याच्या कुटुंबासह राहत होता. सोनू व रामजी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणे होत होती. 31 मे, 2020 रोजी सोनू हा रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घराबाहेर ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी रामजी तेथे आला व सोनूला पाहून मागील भांडणाच्या कारणावरून त्यास शिव्या देऊ लागला.
त्यावरून सोनू याने विचारले की, तु मला सतत शिव्या का देतो? असे म्हणाल्याचा रामजीला राग आल्याने त्याने सोनूला मारहाण केली. सोनूचा गळा दाबून त्याचा जीव घेतला. याप्रकरणी सुनीता परसू कांबळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रामजी विक्रम प्रसाद याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार प्रबोध हंचे यांनी सहकार्य केले.