Friday, November 22, 2024
Homeक्राईमजनावरांचा टेम्पो पकडल्याने तरुणावर खुनी हल्ला

जनावरांचा टेम्पो पकडल्याने तरुणावर खुनी हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉड, बेसबॉलचे दांडके व तलवारीने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. सोमवारी (16 सप्टेंबर) रात्री जेऊर बायजाबाई (ता. नगर) शिवारातील सब स्टेशन चौकात ही घटना घडली. दीपक बाबासाहेब शिंदे (वय 28 रा. जेऊर बायजाबाई) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

आयनुर कुरेशी, युनूस कुरेशी (दोघे रा. जेऊर बायजाबाई) व इतर सात ते आठ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आयनुर कुरेशीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सोमवारी रात्री दीपक शिंदे व त्यांच्या साथीदाराने गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दीपक शिंदे सब स्टेशन चौकात असताना आयनुर कुरेशी व इतर सात ते आठ जण तीन वाहनांतून तेथे आले. त्यांनी दीपकला एका वाहनात बसून काही अंतरावर नेले. तेथे त्यांनी दीपकवर लोखंडी रॉड, बेसबॉलचे दांडके व तलवारीने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.

सदरची घटना समजताच मोठा जमाव त्याठिकाणी जमा झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. नागरिकांनी दीपक शिंदे यांना उपचारासाठी नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयनुर कुरेशी याला ताब्यात घेत अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी अधिक तपास करत आहेत.

11 जनावरांची सुटका
गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याने साडेआठ लाख रुपये किमतीचा एक टेम्पो व एक लाख 30 हजारांचे 11 गोवंशीय जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलीस अंमलदार सुरज देशमुख यांच्या फिर्यादीवरून टेम्पो (एमएच 44 टी 7486) चालका विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या