Sunday, May 19, 2024
Homeक्राईमयुवकावर खुनी हल्ला करणारे सहाजण अटकेत; एलसीबीची कामगिरी

युवकावर खुनी हल्ला करणारे सहाजण अटकेत; एलसीबीची कामगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागरदेवळे (ता. नगर) येथील युवकावर तलवार, रॉड, दांडक्याने खूनी हल्ला करणार्‍या टोळीतील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत अटक केली आहे. सोमवारी (दि. 6) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला होता. यात पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे) हा युवक जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून नऊ जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोहेल चाँद शेख (वय 26), शोएब चाँद शेख (वय 26, दोघे रा. बुर्‍हानगर रस्ता, नागरदेवळे), शोएब हमीद सय्यद (वय 23), अमीन हुसेन पठाण (वय 21, दोघे रा. गोटीची तालीमजवळ, नागरदेवळे), साहील अकबर पठाण (वय 28 रा. मराठी शाळेमागे, नागरदेवळे), रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण (वय 30 रा. विठ्ठल रूख्मीणी मंदीराजवळ, नागरदेवळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघे पसार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पुष्कर हे नागरदेवळे गावातून सोमवारी सायंकाळी त्यांच्या मित्रासोबत किराणा माल घेऊन घरी जात असताना सोहेल चाँद शेख व त्याच्या इतर साथीदारांनी पुष्कर यांना तलवार, लाकडी दांडके, लोखंडी गजाने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. तसेच त्यांच्या मित्राला सुध्दा शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना संशयित आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, संतोष लोढे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, सचिन अडबल, अरूण मोरे यांची दोन पथके तयार करून संशयित आरोपींची माहिती काढली असता ते मुकुंदनगर भागात एका शेडमध्ये लपून बसलेले असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांना भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या