Tuesday, November 19, 2024
Homeक्राईमयुवकाचा खून करणारे पाच जण गजाआड

युवकाचा खून करणारे पाच जण गजाआड

एलसीबीला खबर दिल्याच्या आरोपावरून केला होता खून || तोफखाना पोलिसांची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एलसीबीच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाचा खून करणार्‍या पाच जणांना गजाआड करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. त्यांना पारनेर तालुक्यातील सुपा येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची (22 नोव्हेंबर) पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

सचिन सर्जेराव चव्हाण (वय 33), संतोष भैरवनाथ पवार (वय 39 दोघे रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट, अहिल्यानगर), सचिन भिमराव ऊर्फ लल्लु पवार (वय 37 रा. ग्रामपंचायत समोर, कडा, ता. आष्टी, जि. बीड), प्रवीण सुभाष पवार (वय 32 रा. भिस्तबाग चौक, बजरंग हॉटेल शेजारी, अहिल्यानगर), रंजित एकनाथ साळुंके (वय 34 रा. गजराजनगर, नगर पेट्रोल पंपामागे, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी रात्री करण अर्जुन साळुंके (वय 22 रा. जे.जे. गल्ली, कोठला) यांना मारहाण केली होती. त्यांचा 13 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला आहे. 2 नोव्हेंबरच्या रात्री करण हे कोठला परिसरातील कोंड्या मामा चौक येथे असताना त्यांचा नातेवाईक सचिन सर्जेराव चव्हाण, संतोष भैरवनाथ पवार व सचिन लल्लु पवार हे दुचाकीवरून तेथे आले.

अनिल सर्जेराव चव्हाण यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गजराजनगर येथे जायचे आहे, असे म्हणत त्यांनी करण यांना दुचाकीवर बसवून गजराजनगर परिसरातील बांबुच्या दुकाना जवळ नेले. तेथे गेल्यानंतर प्रवीण पवार, रंजित साळुंके हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तू एलसीबीच्या पोलिसांना मी तलवार विक्री करतो म्हणून माझी माहिती का दिली’ असे म्हणत हत्याराने वार केला. लाकडी दांडके, दगड, कंबर पट्ट्याने मारहाण करून जखमी केले. जखमी करणवर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान 13 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

दरम्यान, मारहाण झाल्यानंतर संशयित आरोपी पसार झाले होते. त्यांचा शोध तोफखाना पोलिसांकडून सुरू होता. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व शैलेश पाटील, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, गणेश धोत्रे, सुधीर खाडे, सुरज वाबळे, वसीम पठाण, सुमीत गवळी, शिरीष तरटे, सतीष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, राहुल म्हस्के, संदीप गिर्‍हे यांच्या पथकाने त्या पाच जणांना सुपा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास निरीक्षक कोकरे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या