अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वाकोडी (ता. अहिल्यानगर) परिसरात एका तरूणाचा अत्यंत क्रूरपणे खून करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी जलद तपास करत दोन संशयितांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रसाद रोहीदास जाधव (वय 39, रा. वाकोडी फाटा) असे मृत तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी मृताच्या पत्नी अश्विनी जाधव यांनी बुधवारी (29 एप्रिल) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम हरी भोसले (वय 20) आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे (वय 42, दोघे रा. वाकोडी फाटा) यांना अटक करण्यात आली आहे. प्रसाद जाधव हे 26 एप्रिल रोजी दुपारी न्यू आर्ट्स कॉलेज येथे पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दुसर्या दिवशी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान बुरूडगाव रस्ता परिसरात प्रसाद यांच्यासोबत दोन संशयित दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत शुभम भोसले आणि समाधान सोनवणे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी धक्कादायक कबुली दिली.
26 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बुरूडगाव ते बाबुर्डी रस्त्यावर त्यांना एका व्यक्तीने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे संतप्त होऊन त्यांनी त्या व्यक्तीला दुचाकीवर बसवून वाकोडी शिवारातील उसाच्या शेतात नेले. तेथे लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यावर व तोंडावर वार करत त्याचा खून केला. गुन्ह्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून शेतात टाकण्यात आला. तसेच मृताची दुचाकी सिना नदी पुलाजवळील झुडपात लपवून ठेवण्यात आली होती. संशयितांच्या कबुलीनुसार पोलिसांनी शोध घेतला असता वाकोडी शिवारातील गट क्रमांक 158 मधील उसाच्या शेतात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आला. ओळख पटवल्यानंतर तो प्रसाद जाधव यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
भिंगार पोलिसांची जलद कारवाई
प्रसाद जाधव हरवल्याची तक्रार दाखल होताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. घरापासून न्यू आर्ट्स कॉलेज पर्यंत तसेच इतर मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रसाद यांच्यासोबत दोन संशयित व्यक्ती दिसून आल्या. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी विशेष पथकासह शोधमोहीम राबवली. काही तरूणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सीसीटीव्हीत आलेल्या दोघा संशयितांची ओळख पटवत शुभम भोसले याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आधीच ताब्यात असलेल्या समाधान सोनवणे याच्यासह गुन्हा केल्याची कबुली मिळाली. दोघांनी मृतदेह फेकलेल्या ठिकाणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह हस्तगत केला. केवळ शिवीगाळ केल्यामुळे खून करण्यात आला की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.





