अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नागापुर येथील अक्षय राजेंद्र ठाणगे (वय 26) यांनी पोकलेन मशिन खरेदीसाठी सुरत येथील भरत जगन्नाथ पाटील (मूळ रा. भालेरगाव, ता. जि. नंदुरबार) याच्याशी 30 लाख रुपयांचा व्यवहार केला. मात्र सदर मशिन न देता त्याच्याकडून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, ठाणगे व त्यांच्या दोन भागीदारांना गुजरात पोलिसांनी खोट्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करत 32 दिवस तुरूंगात ठेवले होते.
अक्षय ठाणगे हे त्यांच्या मित्रांसह बांधकाम व जमीन विकास व्यवसाय करतात. त्यांनी भरत पाटील याच्याकडून पोकलेन मशिन खरेदी करण्यासाठी एकूण 30 लाख रुपयांचा व्यवहार केला. 12 मे 2023 रोजी सुरत येथे मशिन पाहिल्यानंतर तो पसंत आल्याने 16 मे रोजी नगर येथे पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये रोख दिले. उर्वरित 25 लाख रुपये 25 मे रोजी भरत पाटील याला गुजरातमध्ये दिले. मात्र, पाटील याने मशिन न पाठवता वारंवार वेळकाढूपणा केला. त्यामुळे ठाणगे आणि त्यांचे भागीदार गुजरातमध्ये गेले असता पाटील याने पैसे परत देण्याचे सांगितले, पण त्याच्या पत्नीकडून अपहरणाची खोटी फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणात गुजरात पोलिसांनी ठाणगे व त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला.
सदर प्रकरणात पोलीस तपासादरम्यान भरत पाटील याने स्वतः कबुली दिली की, त्याने अक्षय ठाणगे यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले असून मशिन न देता त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात ठाणगे यांनी सोमवारी (5 मे) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून भरत पाटील विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.