Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजतरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी व्यायामाला प्राधान्य द्यावे – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी व्यायामाला प्राधान्य द्यावे – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा समारोप

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

पारंपरिक खेळाच्या माध्यमातून शारीरिक क्षमतेचा कस लागतो आणि चांगला व्यायाम होतो. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

- Advertisement -

ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आयोजित पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित करण्यात आला होता.

स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
रविवार, ता. ९ रोजी स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सीमा हिरे, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू कविता राऊत, विभागाच्या संचालक माधवी सरदेशमुख, सहसंचालक अनिल गावित, क्रीडा विभागाच्या उपसंचालक साळुंखे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष संजय पाटील, क्रीडा प्रशिक्षक वीरेंद्रसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विजयी व उपविजयी संघांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

पारंपरिक खेळांचा पुनरुज्जीवन गरजेचा – मंत्री महाजन
यावेळी मंत्री महाजन म्हणाले, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मी कबड्डी, व्हॉलिबॉल आणि कुस्तीमध्ये पुणे विद्यापीठ तसेच राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पारंपरिक खेळ मागे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी पुढाकार घेत पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम आणि खेळाकडे अधिक लक्ष द्यावे. व्यायामाची सवय लागली की व्यसनांकडे ओढ वाटत नाही.तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमामुळे देशाला अनेक प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. या स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेचे भविष्यात व्यापक आयोजन – मंत्री लोढा
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने अल्प कालावधीत उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली आहे. सहभागी स्पर्धकांनी देशी खेळांचा आनंद घेतला. भविष्यात या क्रीडा महाकुंभाचे आयोजन आणखी मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालक माधवी सरदेशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर सहसंचालक अनिल गावित यांनी आभार मानले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी ‘एचएएल’सोबत सामंजस्य करार
कार्यक्रमादरम्यान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मंत्री गिरीश महाजन व मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कराराच्या माध्यमातून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना ‘एचएएल’ ऑनलाइन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...