नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हरियाणातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसारची रहिवासी असलेली ज्योती मल्होत्राला कैथल येथून अटक करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी आतापर्यंत भारताची हेरगिरी करणाऱ्या एकूण 6 लोकांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला यूट्यूबर आणि इतर लोक पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेच्या संपर्कात होते.
युट्युबर असलेली ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. ज्योती मल्होत्रा स्वतःचे ट्रॅव्हल चॅनल चालवते, ती पाकिस्तानलाही गेली होती आणि पाकिस्तानमध्ये अनेक गुप्तचर माहिती शेअर करत होती.
यापूर्वी हरियाणा पोलिसांनी कैथल येथून २५ वर्षीय देवेंद्र, पानीपत येथून एक मुस्लिम युवक आणि नूह येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. आता महिला यूट्यूबरला पानीपत येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. याशिवाय पंजाबमधील मालेरकोटला आणि बठिंडा येथूनही हेरगिरीच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे.
ज्योती मल्होत्राचे यूट्यूबवर ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाचे चॅनेल आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने कमिशन एजंटकडून व्हिसा मिळवून २०२३ साली पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या व्यक्तीशी तिचा संबंध आला.
पाकिस्तानला दोनदा केला होता प्रवास
ज्योती मल्होत्रा दोनदा पाकिस्तानला गेली जिथे दानिशच्या सांगण्यावरून ती त्याचा ओळखीचा अली अहवानला भेटली, जिथे अली अहवानने तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली. पाकिस्तानात अली अहवानने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत तिची भेट घडवून आणली.
भारत सरकारने दानिशला पर्सन नॉन ग्रेटा (अनावश्यक व्यक्ती) घोषित करून त्याची उच्चायुक्तालयातून १३ मे २०२५ रोजी हकालपट्टी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानेच ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी (PIOs) करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्हॉट्सॲप, टेलिग्राम,स्नॅपचॅटच्या माध्यमातून कनेक्टेड होती
व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्योती पाकिस्तानी ऑपरेटिव्ह शाकिर ऊर्फ राणा शाहबाजच्या संपर्कात होती. याचा फोन नंबर तिने जट रंधवा या नावाने सेव्ह केला होता. या काळात ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशलाही अनेक वेळा भेटली.
ज्योतीने सांगितले की, ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती. विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली १३ मे रोजी दानिशला भारत सोडण्याचे आदेश दिले होते. आता ज्योती जी न्यू अग्रसेन एक्सटेंशन, हिसारची रहिवासी आहे. तिला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १५२ आणि ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट १९२३ च्या कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा