दिल्ली । Delhi
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा तपास यंत्रणांसमोर दिलेला कबुलीजबाब समोर आला असून, त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. ज्योतीने भारतातून पाकिस्तानपर्यंतच्या आपल्या प्रवासातील देशविरोधी कृतींचे तपशील तपास यंत्रणांसमोर उघड केले आहेत. तिच्या कबुलीजबाबाने सुरक्षा यंत्रणांत खळबळ उडाली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या इशाऱ्यानुसार काम करत होती. ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशच्या सतत संपर्कात होती. ज्योतीने तिच्या यूट्यूब चॅनेल ‘Travel with Jo’ च्या माध्यमातून पाकिस्तानात प्रवास केला. २०२३ मध्ये व्हिसा मिळवण्यासाठी ती दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची ओळख दानिश ऊर्फ अहसान-उर-रहीम या अधिकाऱ्याशी झाली. त्याच्याशी मोबाईलद्वारे संवाद सुरू झाला आणि त्यानंतर ती दोन वेळा पाकिस्तानला गेली.
पाकिस्तानमध्ये दानिशच्या सांगण्यावरून ज्योतीने अली हसन या आयएसआय अधिकाऱ्याची भेट घेतली. अलीने तिच्या राहण्याची व प्रवासाची संपूर्ण व्यवस्था केली होती. त्याच माध्यमातून तिची ओळख शाकीर आणि राणा शाहबाज या इतर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी झाली. ज्योतीने शाकीरचा मोबाईल नंबर सेव्ह केला होता, मात्र त्याला ‘जाट रंधावा’ असे नाव दिले होते जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही.
तिने कबूल केलं की, व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात होती. या प्लॅटफॉर्म्सद्वारे तिने देशविरोधी माहिती पाकिस्तानला पाठवली होती. दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात दानिशला ती अनेक वेळा भेटली असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या एका व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आयएसआय अधिकारी अली हसन आणि ज्योती यांच्यातला संवाद समोर आला आहे. यात अटारी बॉर्डरवरील एका अंडर कव्हर एजंटबाबत माहिती मिळवण्याचं काम ज्योतीला सोपवण्यात आल्याचं स्पष्ट होतं. अली हसनने तिला त्या एजंटला विश्वासात घेऊन एका गुरुद्वारात आणण्याचे आदेश दिले होते. या संवादातून स्पष्ट होते की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय गुप्तहेरांची माहिती मिळवण्यासाठी ज्योतीचा वापर करत होती.
सध्या ज्योती मल्होत्रा पोलिसांच्या ताब्यात आहे. रविवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास पोलीस तिच्या घरी पोहोचले आणि तिला ताब्यात घेतले. तिच्या घरात एका चिठ्ठीचा सुद्धा सापड झाला. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरीण सवितासाठी लिहिलेली होती. त्यामध्ये ती लिहिते – “सविता को कहना फ्रूट ला दे। घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी।” या चिठ्ठीत एका औषधाचं नाव, डॉक्टरचं नाव आणि शेवटी – लव यू.. खुश-मुश – असं लिहिलं होतं. त्यामुळे अटकेच्या क्षणी तिचा मानसिक ताणही दिसून येतो.
ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार येथे राहणारी एक सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचं बालपण आणि शिक्षण सर्वसामान्य परिस्थितीत झालं. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर तिने तात्काळ नोकरीच्या शोधात धाव घेतली. सुरुवातीला एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर हिसारपासून २० किमी अंतरावर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. काही काळाने पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून हिसारच्या एका मार्केटमधील कार्यालयात काम सुरु केलं. सतत नोकऱ्या बदलत राहणं आणि स्थिरतेचा अभाव ही तिच्या जीवनशैलीची एक प्रमुख बाब होती.
तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीला आलिशान आणि लक्झरी आयुष्याची फार मोठी हौस होती. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होती आणि युट्यूबवर प्रवासविषयक व्हिडीओ अपलोड करत होती. तिचं ‘Travel with Jo’ हे युट्यूब चॅनेल त्या हौशी जीवनशैलीचं उदाहरण होतं. मात्र, जास्त पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी ती हळूहळू देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाली.