नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या औचित्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची दिल्लीतील ६ जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून अनेक राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असतानाच अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी मोठे विधान केले आहे.
विधानसभा निवडणूक निकालांनंतर अजित पवार व शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही दिग्गज पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यात युगेंद्र पवार यांनी केलेल्या विधानामुळे त्यात अधिक भर पडली आहे.
भेटीकडे राजकीय नाहीतर कौटुंबिक दृष्टीने पाहावे. विचार वेगळे झाले असले, तरी कुटुंब नेहमी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी इच्छा युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. युगेंद्र पवार म्हणाले, “अजितदादा शरद पवार यांना भेटण्यासाठी येणार होते, याची माहिती नव्हती. आमच्या कुटुंबाने कौटुंबिक संबंध वेगळे ठेवले आहेत. मात्र, शरद पवार यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्यामुळे भेटण्यासाठी अजितदादा आले असतील.”
राजकारणात आता दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, “कार्यकर्त्यांची तशी भावना असू शकते. मी यावर कसे बोलणार, पक्षाचे ज्येष्ठ नेते याबद्दल ठरवतील” निवडणुका परस्परांविरोधात लढवल्या, निवडणूक काळात प्रचंड टीका झाली, त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, “एवढी जबरदस्त टीका दोन्ही बाजूंनी झाली नाही. कोणी पातळी सोडली नाही. आमचे कुटुंब कधी तसे वागत नाही. शेवटी राजकारण एका बाजूला असले पाहिजे, विचार वेगळे असले पाहिजेत. आता ते वेगळे झालेत. पण कुटुंब नेहमी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत. असाच आजचा हा प्रयत्न असेल”, असे त्यांनी नमूद केले.
ही भेट राजकीय होती की, कौटुंबिक? त्यावर १०० टक्के ही भेट कौटुंबिक होती, असे उत्तर त्यांनी दिले. दादा आत आले, त्यावेळी रेवती आणि सदानंद सुळे हॉलच्या बाहेर होते, रेवतीचा राग आहे का? त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, “असे काही नाही. रेवतीचा राग वैगेर अजिबात काही नाही. तिचा काय संबंध? माझी लहान बहिण आहे”.