दिल्ली | Delhi
युवराज सिंग म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भावनेशी निगडीत नाव. २००० ते २०१७ अशी तब्बल अठरा वर्ष त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिली. निवृत्तीनंतरही, क्रिकेटशौकीन त्याला विसरले नाहीत. खरंतर, कधीच विस्मृतीत जाणार नाही अशी कामगिरीच युवराजने केली आहे. युवराज सिंग आज 39 वर्षाचा झाला आहे. मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय युवराजने घेतला आहे. युवीने वाढदिवसाचे निमित्त साधत ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. युवराजच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं युवराजनं ट्विट करत सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी इच्छाही त्यानं व्यक्त केली आहे. शिवाय वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे युवराजनं स्पष्ट केलं आहे. यामध्ये युवराज म्हणतोय की, ‘शेतकरी हे आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी इच्छा आहे.’ तसेच ‘वडिलांनी केलेले वक्तव्यही निराशजनक असल्याची प्रतिक्रिया युवराजनं यावेळी दिली आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांच्या वक्तव्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्यांचं ते व्यक्तगत मत आहे. त्याच्याशी मी सहमत नाही.’
काय म्हणाले होते युवराजचे वडील?
काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेले युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी हिंदूंच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. पंजाबी भाषेत त्यांनी केलेल्या भाषेत त्यांनी महिलांच्याबद्दलही आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.