मुंबई । Mumbai
भारताचा माजी क्रिकेटपटू झाहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या प्रसिद्ध जोडप्याने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, त्यांच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यात आले आहे.
या आनंदाच्या बातमीची माहिती खुद्द झाहीर आणि सागरिकाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली. बुधवारी दोघांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या मुलाच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. या फोटोमध्ये झाहीर खान आपल्या मुलाला मांडीवर धरून बसलेला दिसतोय, तर सागरिका त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभी आहे. या क्षणामध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.
या फोटोसोबत त्यांनी लिहिलं आहे, “प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आम्ही आमच्या गोंडस मुलाचे म्हणजेच फतेहसिंह खानचे स्वागत करतो.” या भावनिक संदेशामुळे अनेकांनी त्यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सागरिका आणि झाहीरच्या या आनंददायी बातमीवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेते अंगद बेदी यांनी “वाहेगुरू” असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही “तुम्हा दोघांचे अभिनंदन” अशी कमेंट केली.
याशिवाय, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चाहत्यांनी देखील त्यांचे हार्दिक स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पोस्टवर हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्यात.
झाहीर खान आणि सागरिका घाटगे हे २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या प्रेमकहाणीने अनेक चाहत्यांची मनं जिंकली होती. लग्नानंतर हे दोघं नेहमीच एकमेकांसोबतच्या क्षणांना सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
फतेहसिंह खान या छोट्या राजकुमाराच्या आगमनामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. चाहत्यांना आता त्यांच्या लाडक्या स्टार्सच्या या नव्या भूमिकेमधील प्रवास पाहायला मिळणार आहे.
झाहीर आणि सागरिका दोघेही त्यांच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. झाहीरने भारतीय संघासाठी अनेक विजयी सामने खेळले असून तो एक कुशल गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तर सागरिका घाटगेने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली आणि ती अभिनय क्षेत्रात आपले स्थान पक्कं करत गेली.