अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
झेंडीगेट परिसरात सर्रास कत्तलखाने सुरू असल्याचे पोलिसांच्या छापेमारीतून समोर येत आहे. सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन कत्तलखान्यांवर छापेमारी करून 13 लाख एक हजार 200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सात जणांविरूध्द दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने एलसीबी व कोतवाली पोलीस झेंडीगेटच्या कत्तलखान्यावर छापेमारी करत आहेत. सोमवारी सायंकाळी एलसीबीचे पोलीस अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढत असताना झेंडीगेट, शाळा क्र. 4 च्या पाठीमागे हाफीज जलील कुरेशी (रा. झेंडीगेट) याने त्याच्या साथीदारासह गोवंशी जातीचे काही जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेले आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून 65 हजारांच्या दोन जिवंत गायींची सुटका केली. त्या गाई हाफीज जलील कुरेशी, गुफरान हाफीज कुरेशी, अल्ताफ खलील कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट) यांनी कत्तलीसाठी आणल्याचे समोर आले आहे. ते तिघे पसार झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेडकर चौक, झेंडीगेट येथे अरबाज गुलामरसुल कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) हा त्याच्या साथीदारासह गोवंशीय जनावरांची कत्तल करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी रफीकउल इस्लाम जमालुद्दीन इस्लाम (वय 19), हानसेन हारून कुरेशी (वय 20, दोघे रा. झेंडीगेट), यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून 12 लाख 36 हजार रुपये किंमतीचे चार हजार 120 किलो गोमांस व सुरा जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी अरबाज गुलामरसुल कुरेशी व शादाब गुलामरसुल कुरेशी (दोघे रा. झेंडीगेट) यांच्या सांगण्यावरून जनावरांची कत्तल केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.