Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar : झेडपीमुळे 868 ग्रामपंचायत निवडणूका लांबणीवर!

Ahilyanagar : झेडपीमुळे 868 ग्रामपंचायत निवडणूका लांबणीवर!

आधीच्या 99 आणि आणखी 769 ग्रामपंचायतींची मुदत संपणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबल्याचे दिसत आहे. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नववर्षात जिल्ह्यात मुदत संपणार्‍या 769 व मागील दोन वर्षापासून प्रशासक असणार्‍या आणि निवडणुकीची प्रतिक्षा असणार्‍या 99 अशा 868 ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 2024-25 वर्षातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आधी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे. आता त्यात नवीन वर्षात फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हाभरातील 769 ग्रामपंचायतींची पाच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या नगर पालिका निवडणुकीची आणि त्यानंतर महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

YouTube video player

या सर्व निवडणुका 31 जानेवारीअखेर संपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगासाठी हा कालावधी अपुरा आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्यांत मुदत संपणार्‍या बहुतांश ग्रामपंचायती दिग्गज नेत्यांच्या गावातील आहेत. त्यामुळे येथेही राजकीय संघर्ष अटीतटीचा असतो. सरपंच निवडही थेट मतदारांतून होणार असल्याने भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याकडे रंगीत तालीम म्हणून पाहतात.

सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

दोनच महिन्यांत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीत इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेषतः थेट सरपंचपदावर अनेकांनी लक्ष केंद्रित करुन कामाला सुरुवात केली आहे. काहींनी जिल्हा व तालुक्यातील नेत्यांशी जवळीक वाढवली आहे, तर काही विद्यमान सरपंचांनी विकास कामांचे नारळ फोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आतापासूनच सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

दसरा-दिवाळीपर्यंत निवडणुका लांबणार
फेब्रुवारीतील निवडणुका लांबल्यास त्या आगामी किमान सहा ते आठ महिने घेता येणार नाहीत. मार्चपासून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे निवडणुकीसाठी शाळांतील वर्गखोल्या आणि शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे निवडणुका पावसाळा संपल्यावर म्हणजे दसरा-दिवाळीतच घ्याव्या लागणार आहेत.

99 ग्रामपंचायती दोन वर्षापासून रखडल्या
जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2025 मधील मुदत संपलेल्या 14 ग्रामपंचायतीच्या देखील प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या 99 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगोदर होतील. शिवाय काही ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यानंतरच 2026 मधील 768 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...