Tuesday, May 21, 2024
Homeनगरजिल्हा परिषदेत आता ई-फायलिंग प्रणाली

जिल्हा परिषदेत आता ई-फायलिंग प्रणाली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सरकारी लालफितीचा कागदी कारभार आता थांबवणार असून यासाठी जिल्हा परिषदेत पुढाकार घेण्यात आला आहे. यापुढे विकास कामांसह कर्मचार्‍यांच्या बदल्या, चौकशा आणि अन्य कामे आता कागदी फाईलव्दारे करण्याऐवजी ते ऑनलाईन ई-फायलिंगव्दारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुण्याच्या यशदा या शासकीय संस्थेमार्फत विभागनिहाय जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच ही प्रणाली जिल्हा परिषदेत कार्यान्वित होणार आहे.

- Advertisement -

यापूर्वी हाताने लिहून जिल्हा परिषदेत विकास कामे, कर्मचार्‍यांच्या बदल्या, विविध खरेदी यांच्या मोठमोठ्या फाईल्स तयार करून ते टेबलनिहाय साहेबांपर्यंत जात होत्या. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट होती. त्यावर आता मात करण्यासाठी जिल्हा परिषदेत आता ई-फायलिंग प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व अधिकार्‍यांचे मेल आयडी काढण्यात आलेले असून विभागनिहाय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पुण्याच्या यशदा या संस्थेमार्फत देण्यात येत आहे.

यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना आता विकास कामांसह अन्य सर्व कामे ऑनलाईन फायलिंग तयार करून त्यावर आपला अभिप्रया हा ऑनलाईन टाकून संबंधीत फाईल पुढील अधिकारी अथवा टेबला पाठवण्यासाठी मेल आयडीचा वापर करावा लागणार आहे. तसेच ई-फाईल परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे आदेश, अध्यादेश हे देखील स्कॅनकरून संबंधीत ई-फाईलला जोडावे लागणार आहेत. यासाठी सर्व कर्मचार्‍यांना स्व:तचा मेल आयडी काढण्याची सक्ती करण्यात येणार आहे. यामुळे या पुढे जिल्हा परिषदेत सर्व फाईलिंचा प्रवास हा ऑनलाईन होणार आहे.

जिल्हा परिषदेतून बर्‍याच वेळा जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकला विभागीय आयुक्त कार्यालय अथवा मंत्रालयात विविध प्रस्ताव आणि फाईल पाठवण्यात येतात. या पुढे या फायली देखील ऑनलाईन पाठवण्यात येणार आहेत. यासाठीचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेत विभागनिहाय सुरू आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अर्थ विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशूसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघू पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग या विभागातील कर्मचार्‍यांना यशदाच्या तज्ज्ञांच्यावतीने याबाबतचे प्रशिक्षण दिलेले आहे.

येत्या 20 तारखेपासून सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर आणि दक्षिण, महिला बालकल्याण विभाग, 22 तारखेला समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी विभाग, आणि पाणी पुरवठा विभागातील यांत्रिक विभागातील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या