Friday, November 22, 2024
Homeनगरबदल्यांच्या आदेशाकडे झेडपी कर्मचार्‍यांच्या नजरा

बदल्यांच्या आदेशाकडे झेडपी कर्मचार्‍यांच्या नजरा

यंदा विनंती बदल्याच होण्याचे संकेत || कर्मचार्‍यांचा होणार हिरमोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा लोकसभा व त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आचारसंहितेमुळे दोन महिन्यांपासून रखडलेल्या आहेत. दरवर्षी 31 मे पर्यंत होणार्‍या कर्मचार्‍यांच्या बदल्या यंदा ऑगस्ट महिना उजाडण्याची वेळ आली तरी झालेल्या नाहीत. यामुळे यंदा कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता कमी असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनूसार यंदा केवळ विनंती बदल्या करण्यात येणार आहेत. मात्र, त्या कधी होणार याबाबत अनिश्चितता आहे.

- Advertisement -

दरवर्षी मे महिन्यांत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या (शिक्षक वगळता गट क व गट ड) बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते. दरवर्षी उन्हाळा आला की कर्मचार्‍यांना बदल्यांचे वेध लागतात. 2023 च्या बदल्या 9 मे पासून सुरू झाल्या होत्या. यंदा मात्र, लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी पुढे गेला आहे. 4 जूनला लोकसभेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतरच बदल्या होणार अशी स्थिती होती. मात्र, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता 5 जुलैच्या दरम्यान संपली.

मात्र, त्यात पुन्हा विधानपरिषदेची निवडूनची आचारसंहिसता लागू झाली. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचार्‍यांच्या बदल्याचे आदेश काढण्यास ग्रामविकास विभागाकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. यामुळे बदली पात्र कर्मचार्‍यांची धाकधूक वाढलेली आहे. आता ऑगस्ट महिना उजाडण्याची वेळ आली असून यंदा बदल्यांना सुट्टी मिळणार की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनूसार यंदा केवळ विनंती बदल्या होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या होत असतात. बदल्यांची प्रक्रिया लांबल्यास अथवा न झाल्यास बदली पात्र कर्मचार्‍यांवर अन्याय ठरणार आहे. पूर्वी जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी गरजवंत आणि वैद्यकीय कारणास्तव कर्मचार्‍यांच्या प्रतिनियुक्त करत होते. मात्र, आता विभागीय आयुक्तांनी प्रतिनियुक्तीचे नियम कडक करत याबाबतचे अधिकारी स्वत:कडे घेतलेले आहेत. यामुळे कर्मचार्‍यांची मोठी अडचण झाली आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी करण्याच्या सूचना खातेप्रमुख व सर्व गटविकास अधिकार्‍यांना दिल्या होत्या. 5 एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने तसे पत्र काढले होते. 14 एप्रिल ते 31 मे या कालावधीत बदल्यांबाबतची सर्व पूर्वतयारी करायची आहे. यात कार्यालयप्रमुखांनी 15 ते 21 एप्रिलपर्यंत त्यांच्या स्तरावर संवर्गनिहाय कर्मचारी सेवाज्येष्ठता यादी तयारी करावी. तसेच त्यावर हरकती घेऊन ही यादी अंतिम करावी. 22 एप्रिलपासून 29 एप्रिलपर्यंत कर्मचार्‍यांनी बदलीसाठी दिलेले विकल्प, विनंती अर्ज विहीत कागदपत्रांसह खातेप्रमुखांकडे सादर करावे, 30 एप्रिल रोजी या विकल्प व अर्जांची छाननी करून माहिती अद्ययावत करावी व जिल्हास्तरावर संवर्गनिहाय खातेप्रमुखांकडे माहिती सादर करावी, असे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या सेवाज्येष्ठता याद्या व इतर तयारी प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. मात्र, त्यानंतर आतापर्यंत बदलीबाबत ग्रामविकास विभागाने कोणतेच मार्गदर्शन अथवा आदेश न दिल्याने अडचण झाली आहे.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या