अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर शहराच्या मध्यवर्ती भागात लालटाकी येथे असणार्या जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीशी दुरवस्था झाली असून ही जागा गवत आणि वेडे बाभळींच्या विळख्यात सापडली आहे. एकेकाळी कर्मचार्यांसाठी नंदनवन असणार्या या जागेत आता फक्त रिकाम्या इमारती असल्याचे दिसत आहे. दरम्यान या ठिकाणी असणार्या कर्मचारी इमारतीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी गरज असणार्या कर्मचार्यांना निवार्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
नगर शहरात लालटाकी परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जागा पडून आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद पदाधिकार्यांसाठी सहा स्वतंत्र बंगले असून यातील एका बंगल्याचे काम झालेले आहे. उर्वरित पाच बंगले जुन्या पद्धतीने बांधलेले असून गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून हे बंगले बंद अवस्थेत आहे. याच ठिकाणी अधिकार्यांच्या राहण्यासाठी काही छोटे-छोटे बंगले असून त्यातही काही मोजके अधिकारी राहत आहेत.
हा भाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून दिल्लीगेट ते जिल्हा रुग्णालय या मुख्यमार्गाला लागून जिल्हा परिषदेची ही जागा आहे. साधारण दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ही जागा बीओटीमधून विकसित करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन सभापती बाळासाहेब हराळे यांनी या प्रस्तावासाठी उचल खाल्ली होती. मात्र बीओटीमध्ये ही जागा विकसकाच्या घशात जाण्याची भीती व्यक्त होऊन, त्यावेळी हा प्रस्ताव बारगळला होता. तेव्हापासून या ठिकाणी असणार्या जिल्हा परिषदेच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
याठिकाणी समाज कल्याण सभापतीच्या बंगल्या शेजारीच तीन मजली कर्मचारी वसाहत आहे. या वसाहतीच्या पलीकडच्या बाजूला आणखीन एक तीन मजली कर्मचारी वसाहत असून सध्या या ठिकाणी कोणी राहत नसल्याचे दिसत आहे. हा परिसर गवताने आणि बाभळींनी पूर्णपणे वेढलेला असून यामुळे या परिसरात कोणी जाण्यास देखील तयार नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून उभी केलेली ही कर्मचारी वसाहत आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या जागेची स्वच्छता करून कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती केल्यास किमान 40 ते 50 कर्मचार्यांच्या निवार्याचा प्रश्न सुटणार आहे. मात्र याकडे पाहण्यास जिल्हा परिषदेला वेळ नसल्याचे दिसत आहे.
याच परिसरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, कृषी, महिला बालकल्याण आणि समाज कल्याण सभापती यांचे जुने खाणी बंगले आहेत. यात केवळ तत्कालीन सभापती कैलास वाकचौरे आणि सुनील गडाख यांनी त्यांच्याकडे असणार्या बंगल्याचे नव्याने बांधकाम केलेले आहे. हा बंगला सोडल्यास अन्य सर्व बंगल्यांची वाईट परिस्थिती असून या ठिकाणी स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमण्याची देखील जिल्हा परिषदेची अडचण झालेली आहे.