चालणार नाही, सरकार आमचेच!
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी महाविकासआघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची सदस्य संख्या जास्त आहे त्यांचा अध्यक्ष होणार असून आमच्याकडे बहुमताचा आकडा निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीचे सदस्य बळ 50 पर्यंत पोहचल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य व पदाधिकार्यांची बैठक नगरमध्ये पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. आशुतोष काळे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. अरुण जगताप, आ. निलेश लंके, माजी आ. चंद्रशेखर घुले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
काकडे म्हणाले, नगर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अडीच वर्षांपासून आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकासुद्धा महाआघाडी करून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यामध्येही आम्ही महाविकास आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे.
गुरूवारी मुंबईत काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांच्या सदस्यांची बैठक झाली होती. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे सर्व सदस्य आहेत, असेही काकडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या बोलाविलेल्या बैठकीला 19 पैकी 17 जण हजर राहिले. दोनजण सोबतच आहेत, मात्र ते काही कारणानिमित्त येऊ शकले नाही असा खुलासाही काकडे यांनी केला. महाविकास आघाडी केल्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्षच्या निवडणुकीमध्ये आमचा आकडा 50 च्या दरम्यान पोहचल्याचा दावाही काकडे यांनी केला.