Monday, May 27, 2024
Homeनगरप्रदीर्घ प्रतिक्षेनंतर झेडपीत 937 रिक्त जागांसाठी भरती

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर झेडपीत 937 रिक्त जागांसाठी भरती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार सरळसेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात जिल्हा परिषदांची 19 हजार पदांची भरती 15 ऑगस्टपूर्वी होण्याची चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गातील 937 पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक 727 पदे आरोग्य विभागाची आहेत. 2019 नंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची भरती जाहीर झाली होती. मात्र, कोविडमुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. आता 2023 मध्ये भरती होणार असून मोठ्या कालावधीनंतर भरती होणार असल्याने इच्छुकांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य सरकारला पाठवला आहे. या आराखड्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ संवर्गातील 927 जागा भरण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभाग पहिल्या टप्प्यात गट ‘क’ मधील रिक्त पदांची भरती करणार आहे. त्यानंतर गट ‘ड’ मधील पदांचा विचार होऊ शकतो. गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्याची सूचना शासनाने केली होती. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत सर्वच जिल्हा परिषदांनी बिंदुनामावलीनुसार रिक्त जागांचा अंतिम आराखडा ग्रामविकास मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यात नगर जिल्हा परिषदेची 937 पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरापासून उमेदवार या भरतीची वाट पाहत आहेत. जिल्हा परिषदेची ही भरती प्रक्रिया राज्यभर आयबीपीएस ही कंपनी राबवणार आहे. याबाबत प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात निघणार असून या कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. त्या दृष्टीने कंपनीने संकेतस्थळावर अर्ज भरण्याची तालीमही करून घेतली व येणार्‍या अडचणी दूर केल्या आहेत.

संकेतस्थळावरही माहिती

जिल्हा परिषद भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच वर्तमानपत्रातदेखील संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस एजन्सीमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

या पदांसाठी भरती

आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), हंगामी फवारणी कर्मचारी, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 727 पदे. सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहायक, लघुलेखक- 14 पदे. अर्थ विभागाचे कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लेखा) 27 पदे. बांधकाम विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता (विद्युत) व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची 64 पदे. पशुसंवर्धन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची 42 पदे. कृषी विभागाचे विस्तार अधिकारी (कृषी) 1 पद. ग्रामपंचायत विभागाचे कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 56 पदे. महिला व बालकल्याण विभाग मुख्य सेविका/पर्यवेक्षिका 6 पदे.

वयोमर्यादा वाढवली

जिल्हा परिषद सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणार्‍या सर्व पदांकरिता अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे. कोविडमुळे ही वयोमर्यादा वाढवण्यात आली असून त्याचा फायदा भरतीमधील उमेदवारांना होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या