अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा असून यातील अनेक शाळामध्ये खोल्यांची दुरूस्तीची गरज आहे. दरवर्षी जिल्हा परिषद 10 कोटींचा निधी शाळा दुरूस्तीवर खर्च करते. मात्र दुरूस्तीची यादी संपायला तयार नाही. 2024-25 या आर्थिक वर्षात 353 शाळा खोल्यांच्या दुरूस्तीला, तर 384 नवीन शाळा खोल्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. येत्या वर्षभरात ही कामे होतील. मात्र, अजूनही 469 शाळा खोल्यांच्या दुरूस्तीची, तर अनेक नवीन खोल्यांची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांना पूर्ण खोल्या बांधण्याऐवजी दरवर्षी 10 कोटींहून अधिक निधी केवळ दुरूस्तीवर खर्च केला जातो. त्यातून काय दुरूस्ती होते, हा संशोधनाचा विषय आहे.
अनेक ठिकाणी मुख्याध्यापकांना विचारात न घेताच सरपंच व त्यांचे ठेकेदार शाळा दुरूस्तीचे प्रस्ताव पाठवतात. त्यातून जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग ही दुरूस्ती करतो. अनेक ठिकाणी शाळांची दुरवस्था झालेली असून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. तेथे पक्के वर्ग बांधण्याऐवजी दरवर्षी दुरूस्तीच्या नावाखाली कोट्यवधींची बिले काढली जातात. जिल्ह्यात यंदा शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन खोल्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून 50 कोटी, तर शिर्डी संस्थानकडून 20 कोटी असा एकूण 70 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यात एकाच वेळी 450 ते 500 वर्ग खोल्यांचे काम करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अनेक वर्गखोल्या अद्यापही धोकादायक स्थितीत आहेत. त्या खोल्यांचे निर्लेखन करूनही वर्गखोल्यांसाठी निधी मिळत नसल्याने विद्यार्थी त्याच पडक्या खोल्यांत बसतात. पावसाळ्यात या खोल्या आणखी धोकादायक होतात. त्यामुळे किमान अशा खोल्या तरी प्राधान्याने बांधाव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
जिल्हा नियोजनकडून मिळणार्या निधीतून दरवर्षी नवीन शाळा खोल्या, तसेच शाळा खोल्यांची दुरूस्ती केली जाते. जसा निधी उपलब्ध होईल, त्याप्रमाणे ही कामे बांधकाम विभागाकडून होतात. शाळा खोल्यांच्या दुरूस्तीचा विषय बांधकाम विभागाकडे आहे.
– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक