अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आठवडाभरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत भरणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा दर शनिवारी सकाळी 7.30 ते 10.30 यावेळेत भरवण्याची मागणी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांकडून होत आहे. हा विषयावर शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेत शनिवारच्या शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी नोंदवली आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडून या विषयाची फाईल अभिप्रयासह मागवली असून त्यावर ते निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात सुमारे 11 हजार 500 प्राथमिक शिक्षक कार्यरत असून साडे तीन हजारांच्या सुमारास प्राथमिक शाळा आहेत. या शाळांची वेळ दररोज सकाळी 10 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत आहे. यापूर्वी आठ दिवसांतून एकदा शनिवारी सकाळी 7.30 वाजता शाळ भरवण्यात येत होत्या. मात्र, यावेळेत गडबडी झाल्याने नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात शाळेच्या वेळेत बदल करून सर्वत्र सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी शाळांची वेळ करण्यात आली. मात्र, आठ दिवसांतून एकादा पुन्हा शाळा भरवण्यात याव्यात. राज्यातील काही जिल्हा परिषदेत असा बदल करण्यात आला आहे, असा दाखला देत नगर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी मागील आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची भेट घेत आठवड्यातून एकदा शाळांची वेळ बदलण्याची मागणी केली.
त्यावर येरेकर यांनी सदर मागणीवर निर्णय न घेता प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासन निर्णय, शिक्षण कायद्यातील तरतूदी यासह संबंधीत काम पाहणारा लिपिक, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या अभिप्रियासह संबंधीत फाईल तयार करून मागवली आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांचे अभिप्रिया पाहून निर्णय घेणार आहे. त्यानंतर निर्णय झाल्यास शनिवारी सकाळी 7.30 ते 10. 30 या वेळेत शाळा भरण्याची शक्यता आहे.
शिक्षक संघटनांचा दावा
ग्रामीण भागात पालक दिवसभर शेतात असतात. यामुळे शनिवारी सकाळी शाळा केल्यास पालक शेतात जाण्यापूर्वीच घरी पोहतील असा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षक संघटनांचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पचनी पडणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.