अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वाढत्या उन्हाच्या कारणामुळे जिल्हा परिषदेसह सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 20 मार्चपासून शाळांना उन्हाळी सुटी लागेपर्यंत जिल्हा परिषदेसह सर्व शाळा सकाळी 7 ते 12.30 या वेळेत भरणार आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासाने बुधवार (दि.19) रोजी निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढले आहेत. वाढत्या उन्हामुळे विद्यार्थी हित पाहून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार व इतर व्यवस्थापनाच्या दीड हजार अशा एकूण पाच हजार शाळा जिल्ह्यात आहेत. त्या सर्वांना हे वेळापत्रक पाळावे लागेल. दरवर्षी मार्च महिना लागला की उष्णता वाढते. त्यामुळे स्थिती पाहून शाळांची वेळ बदलली जाते. नियमित शाळा सकाळी 10.30 ते 5 या वेळेत भरतात. परंतु उन्हाळ्यात अनेक ठिकाणचे पाणी कमी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय अनेक शाळा पत्र्याच्या असल्याने उकाड्याचा त्रासही विद्यार्थी, शिक्षकांना सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा शिक्षकच शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी करतात. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळा गुरूवारपासून (दि. 20) सकाळी सात ते दुपारी साडेबारा या वेळेत भरणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या 1 मे पासून लागणार आहेत. तोपर्यंत म्हणजे साधारण 40 दिवस शाळा सकाळच्या सत्रात सुरू राहतील.
क्यूआर कोडचे कोडे
जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षकांसह ग्रामसेवक संघटना यांच्यामध्ये दैनदिन हजेरीसाठी क्यूआर कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावरून शिक्षक संघटना आणि प्रशासनात चांगलाच भडका उडाला होता. शिक्षक संघटनांनी या विषयाला विरोध करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेत हा विषय थांबवण्याची मागणी केली होती. या विषयात अखेर प्रशासानाने नमते घेतले एक महिन्यांसाठी हा विषय थांबवला होता. मात्र, त्यानंतर हा विषयच गायब झाला असून यामुळे जिल्हा परिषदेच्या अन्य विभागाच्या कर्मचार्यांना क्यूआर कोडचे कोडे पडले आहे.
मधली सुटी साडेनऊला
याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्वतंत्र वेळापत्रक तयार केले असून यात सकाळी शाळा भरल्यानंतर पहिली दहा मिनिटे परिपाठ होणार आहे. त्यानंतर आठ तासिका पूर्ण करण्यात येणार आहेत. सकाळच्या सत्रात शाळा भरणार असल्याने सकाळी 9.35 ते 10.10 अशी 35 मिनिटांची मधली सुट्टी राहणार आहे.