अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मोठ्या संख्याने बदलीसाठी आलेले अर्ज, रिक्त असणार्या मोजक्या जागा यामुळे यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि प्राथमिक शिक्षक विभागातील अधिकारी कर्मचारी मुख्यालयात बसून तर बदली पात्र शिक्षक त्यात्या पंचायत समितीमधून ऑनलाईन जोडले गेले. या ऑनलाईन प्रक्रियेत गुरूजीची बदलीसाठी होकार- नकाराची प्रक्रिया राबवण्यात आली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बदली पात्र शिक्षकासाठी शनिवारी ऑनलाईन प्रक्रिया राबवली. यंदा शिक्षकांच्या बदलीसाठी राज्य सरकार पातळीवरून कोणतेच स्पष्ट आदेश नव्हते. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब करत शिक्षकांच्या बदल्या उरकून घेतल्या. नगर जिल्ह्यात शिक्षक संघटनांच्या मागणीनूसार अखेरच्या टप्प्यात प्रशासनाने बदल्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार शनिवारी सकाळी 10 वाजेपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली.
यंदा बदल्यासाठी 3 हजार 800 विक्रमी अर्ज आलेले होते. यात संवर्गनिहाय 1 ते 4 कॅटेगिरीत बसणारे शिक्षक, यासह उपाध्यापक, पद्वीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि हिच पध्दत उर्दूमाध्यमातील शिक्षकांसाठी राबवण्यात आली. यामुळे शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रशासनाला अवघ्या 1 हजार ते 1 हजार 200 शिक्षकांचा बदलीसाठी होकार-नकार घेता आला. या दरम्यान 101 पात्र आणि नियमात बसलेल्या शिक्षकांच्या बदल्या करता आलेल्या आहेत. रात्री उशीरा 11 वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.
नगरला मुख्यालयात बदलीच्या प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. तर तालुका पातळीवरून 14 पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह बदली पात्र शिक्षक हजर होते.
या बदली प्रक्रियेत हजर असणार्यांना बदलीत सोय होता येत नसल्याने सेवाज्येष्ठतेने येणार्या नंबरनिहाय होकार अथवा नकार देता येत होता. यावेळी गैरहजर असणार्यांचा नकार गृहीत धरून प्रक्रिया उरकण्यात येत होती. ऑनलाईन पध्दतीमुळे यंदाच्या प्रक्रियेत कोणालाही हस्तक्षेप करता येत नव्हता. रिक्त होणार्या जागेमुळे काहींची सोय झाली. तर जागा शिल्लक नसल्याने पात्र असतांनाही अनेकांना ऐनवेळी बदलीस नकार द्यावा लागला.