Sunday, June 16, 2024
Homeनगरमुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची ठाण्याला बदली

मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची ठाण्याला बदली

आचारसंहितेत अपर मुख्य सचिवांचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (आयएएस) यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. येरेकर यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी काढले आहेत. दरम्यान येरेकर बदलीच्या ठिकाणी जाणार की नगरला थांबणार याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपलेली नसतांना बदलीचे आदेश निघाले आहेत.

2018 चे आयएएस अधिकारी असणारे येरेकर हे 6 मे 2022 रोजी नगरला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदलून आले होते. त्यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प सहायक एकात्मिक आदिवासी या पदावर काम केलेले आहे. नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करतांना त्यांनी कमी कालावधीत प्रशासनावर पकड निर्माण केली होती. गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीत नगर जिल्हा परिषदेत काम करतांना येरेकर यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या काळात जलजीवन ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी पाणी योजना राबवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपलेली नसतांना येरेकर यांच्या बदलीचे आदेश निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर मंगळवारी रात्री आणि बुधवारी सोशल मीडियावर बदलीचे आदेशाचे पत्र व्हायरल झाले होते. हे पत्र कोणी व्हायरल केले याचा तपशील मिळाला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या