Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : निवडणुकीसाठी गाव पुढारी टवकारले!

Ahilyanagar : निवडणुकीसाठी गाव पुढारी टवकारले!

झेडपी, पंचायत समिती आरक्षणाच्या भितीने अनेकांच्या पोटात गोळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली असून आरक्षणाच्या सुधारित नियमाबाबत ग्रामविकास विभागाच्यावतीने मागील आठवड्यात राजपत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. यात यंदापासून झेडपी व पंचायत समितीसाठी नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे. मागील आरक्षणाचा प्रभाव नव्याने काढण्यात येणार्‍या आरक्षणावर राहणार नसल्याने अनेक गट आणि गणात मोठे फरबदलाची शक्यता आहेत.

- Advertisement -

नव्याने निघणार्‍या आरक्षणाच्या भितीमुळे अनेक ठिकाणी इच्छुक धास्तावले असून आपल्या गटात कोणते आरक्षण निघणार याचा अंदाज बांधण्यात सध्या व्यस्त असल्याचे दिसत आहेत. मनाप्रमाणे आरक्षण निघणार की नाही, आरक्षण न निघाल्यास गेल्या काही वर्षातील तयारीचे काय होणार या भितीपोटी अनेकांच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे. 2017 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक झाल्यानंतर 2022 ला त्यांची मुदत संपणार होती. मात्र, त्यानंतर सुमारे साडेतीन वर्षे निवडणूका रखडल्या. यामुळे गावागावात राजकारण करणार्‍या पुुढार्‍यांवर राजकीय बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळी. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नगरसह राज्यात गट आणि गणाची प्रभाग रचना जाहीर झाली असून आता सर्वांच्या नजरा आता आरक्षणाकडे लागल्या आहेत.

YouTube video player

गेल्या पंचवार्षिकला जिल्ह्यात 73 जिल्हा परिषद गट होते. यात अनुसूचित जातीसाठी 9 (महिला 5), अनुसूचित जमातीसाठी 7 (महिला 4), नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 20 (महिला 10) असे आरक्षण निघाले होते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 18 आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला 18 असे 73 गटांचे आरक्षण होते. यंदा जिल्हा परिषद गटांची संख्या ही 75 झाली असून यामुळे वाढणारे आरक्षण कोणत्या प्रवर्गात जाणार हे प्रारूप आरक्षण जाहीर झाल्यानंतर कळणार आहे. यंदाच्या आरक्षणाच्या नवीन राजपत्रात 50 च्या खाली गुणांकन असणारा शुन्य आणि 51 पेक्षा अधिक गुणांकन असणारा संपूर्ण एक असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अर्ध्या गुणांकानाचा कोणत्या प्रवर्गावर प्रभाव पडणार हे लवकरच कळणार आहे.

दरम्यान, यंदाचे आरक्षण हे कोणत्या पंचवार्षिकाशी साम्य असणारे राहणार जुळवा जुळव सध्या गावखेड्यावर सुरू असल्याचे चित्र आहे. काहींच्या मते यंदाचे आरक्षण हे 2002 च्या आरक्षणाशी साम्य असणारे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, या विषयावर जिल्हा प्रशासनाकडून चुप्पी साधण्यात आली आहे. आरक्षण घोषणेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून आल्यावर त्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे गाव पुढार्‍यांचा जीव आणखीच टांगणीला लागला आहे.

300 यंत्रांची अडचण
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीजिल्ह्याला 3 हजार 597 कंट्रोल युनिट आणि2 हजार 176 बॅलेट युनिट प्राप्त झाले होते. या यंत्राची प्रथम तपासणी पूर्ण झाली असून यात 300 च्या जवळपास यंत्रणांची अडचण असून उर्वरित यंत्रे ओके असल्याचे निवडणूक प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. आता लवकरच कर्मचारी नियुक्तीचे आदेश काढण्यात येणार आहे. त्यासाठी टप्प्याने कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...