Tuesday, December 10, 2024
Homeनगरझेडपी 5 वी ते 8 वीची स्वाध्याय पुस्तिका तयार करणार

झेडपी 5 वी ते 8 वीची स्वाध्याय पुस्तिका तयार करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्राचा पहिला टप्पा पूर्ण होत आला तरी शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

- Advertisement -

दुसरीकडे ऑनलाईन अध्ययनात अनेक अडथळे असून त्यावर मात करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांंपर्यंत स्वाध्यायपुस्तिका पोहोचवल्या जाणार असून त्याव्दारे ऑफलाईन अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वाटप केल्या असून आता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रामाकांत काटमोरे यांच्या संकल्पनेतून ही स्वाध्याय पुस्तिका पुढे आली असून जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार विद्यार्थ्यांंपर्यंत या स्वाध्यायपुस्तिका पोहचविण्याचे काम सुरू आहे. या स्वाध्याय पुस्तिका उपक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या पाठ्यक्रमावर आधारित इयत्तानिहाय चार स्वाध्यायपुस्तिका विकसित करण्यात आल्या.

या स्वाध्याय पुस्तिकांची छापील प्रत विद्यार्थ्यांंना उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिलीची स्वाध्याय पुस्तिका 44 पानांची, दुसरीची 48, तिसरी व चौथीची प्रत्येकी 49 पानांची आहे. ग्रामपंचायतीला 14 वा व 15 वा वित्त आयोगाचा निधी मिळतो. या निधीतून शिक्षणासाठी खर्च करण्याची तरतूद आहे. स्वाध्यायपुस्तिकांच्या छपाईसाठी प्रत्येकी 3 हजार रुपये ग्रामपंचायतींनी द्यायचे आहेत, तशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.

यापेक्षा अधिक खर्चाची आवश्यकता भासल्यास स्थानिक पातळीवर लोकसहभागातून खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसात या स्वाध्यायपुस्तिका वितरित केल्या जातील. विद्यार्थ्यांंच्या अध्ययनात खंड पडू नये, सर्व स्वाध्याय कृतिवहीत पूर्ण करणे, स्वाध्यायपुस्तिका सोडवण्यासाठी त्या विषयाचे पाठयपुस्तक वापरता येणार आहे, त्यासाठी आई, वडील भाऊ, बहीण, मित्रांची मदत घेता येणार आहे, अधिक अडचणी आल्यास शिक्षकांशी संपर्क करता येणार आहे, सोडवलेल्या स्वाध्यायपुस्तिका शिक्षकांनी काही ठरावीक काळानंतर तपासायची आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेत तज्ज्ञ शिक्षकांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या स्वाध्याय पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यातील काही खासगी शाळांनी तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांपेक्षा वेगळी आणि सोपी अशी पुस्तिका तयार करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेणारी 35 ते 40 हजार विद्यार्थी असून त्यांना या पुस्तिकेचा लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान, पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या स्वाध्याय पुस्तिका वाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.

शाळेसाठी पालकांचे संमतीपत्र घेणार

राज्यात करोना संसर्गामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत आताच सांगता येणे कठीण आहे. मात्र, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनूसार जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्यात येणार आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार पातळीवरून आदेश निघणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या