अक्कलकुवा | श.प्र. –
अंगणवाडयांच्या बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी अक्कलकुवा येथील गटविकास अधिकार्याला १८ हजार तर सहाय्यक लेखाधिकार्याला ८ हजाराची लाच घेतांना नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे, यातील तक्रारदाराने पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. या तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदाराने येथील पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रविन्द्र सुखदेव लाडे याला वेळोवेळी पाठपुरावा केला.
परंतू तक्रारदाराच्या बिलाची रक्कम सहाय्यक लेखाधिकारी रविन्द्र लाडे याने ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा केला असता लाडे याने तक्रारदाराच्या एका कामाचे बिल २ लाख ४६ हजार ८५० रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले, जे तक्रारदारांच्या बँक खात्यात मिळाले.
परंतू लाडे याने एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत स्वतःसाठी ८ हजार रुपये व गट विकास अधिकारी विजय लोंढे याच्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. काल दि.२५ जुलै रोजी पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान सहाय्यक लेखाधिकारी रविन्द्र लाडे याने ८ हजार रुपयांची लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली. तसेच गट विकास अधिकारी विजय लोंढे याने तक्रारदाराकडून १८ हजार रूपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना मिळून आले.
म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित, हेमंत महाले, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.