नाशिक । प्रतिनिधी
अवकाळी पावसाने बाधित शेतकर्यांना मदत म्हणून जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात शासनाकडून १८१ कोटी ५० लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. यातून आठ तालुक्यातील ४९ हजार शेतकर्यांना ३२ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. बाधित शेतकर्यांच्या खात्यावर ही मदत वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित बाधित शेतकर्यांना देखील तत्काळ मदत देण्यासाठी महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.
ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या अवकाळी पावसाने ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टवरील पिके आडवी झाली. भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटींची आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८१ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार आणि खरीप पिकांसाठी 8 हजार रुपये मदत जाहीर झाली आहे. पण त्यात २ हेक्टरपर्यंतची आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांनाच मदतीची अट घातली.
त्यानुसार २ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले असले तरीही संबंधित शेतकर्यास २ हेक्टरच्या मर्यादेतच भरपाई दिली जाईल. याप्रमाणे महसूल आणि कृषी विभागाने लागलीच पात्र शेतकर्यांची निश्चित करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत १ लाख २३ हजार शेतकर्यांची वर्गीकरण पूर्ण झाले आहे. त्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५ लाख ५१ हजार ११६ हेक्टरवरील ७ लाखांवर शेतकर्यांना ही मदत मिळू शकेल. शनिवार (दि.३०) पर्यंत ४९ हजार २६३ बाधित शेतकर्यांंच्या खात्यावर ३२ कोटी ६५ लाख २८ हजार वर्ग करण्यात आले आहे. उवर्रित बाधित व मदतीसाठी प्राप्त शेतकर्यांना एक ते दोन आठवड्याच्या आत मिळण्याची चिन्हे आहेत.
तालुकानिहाय बाधितांना प्राप्त मदत (लाखात)
तालुका शेतकरी रक्कम
मालेगाव 14390 140.02
बागलाण 8675 715.91
दिंडोरी 5595 703.83
देवळा 6563 599.01
सुरगाणा 2620 148.56
चांदवड 1825 187.53
येवला 1333 128.58
सिन्नर 8262 641.84