धुळे (प्रतिनिधी): जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या “बालस्नेही पुरस्कार २०२४” साठी उत्कृष्ट पोलीस अधीक्षक या नामांकनासाठी निवड झाली आहे. आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
हा पुरस्कार सोहळा ३ मार्च रोजी दुपारी १ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडणार आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व ना. अजित पवार, तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
एसपी श्रीकांत धिवरे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या बालस्नेही कार्यपद्धतीची दखल राज्यस्तरावर घेतली गेली आहे. त्यांनी धुळे जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पोलीस दादा, पोलीस दीदी असा असा अनोखा उपक्रमही राबवला. तसेच पोलीस अधीक्षक धिवरे यांनी स्वतः शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांसह, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.