धुळे | प्रतिनिधी
शहरातील गुलमोहर शासकीय विश्राम गृहातील खोलीमध्ये आढळून आलेल्या रोकड प्रकरणाच्या तपासाला पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी वेग दिला आहे. गुलमोहरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज, रजिस्टर जप्त करण्यात आले असून कर्मचार्यांसह संबंधीतांचे जाबजबाब देखील नोंदविण्यात येत आहे. दरम्यान काल रात्री विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची एसपींनी चौकशी केली.
गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्र. १०२ मध्ये १ कोटी ८४ लाख ८४ हजार रूपयांची रोकड सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची एसपी धिवरे यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीला गती दिली आहे. आज पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे. पी. स्वामी यांची भेट घेवुन प्रकरणाबाबत चर्चा केली. तसेच पोलिसांनी संबंधितांचे जबाब नोंदवले असून गुलमोहरमधील कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि अन्य संबंधितांची चौकशी सुरू आहे.
तसेच गुलमोहरमधील सर्व सहा सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून लवकरच त्याचे परीक्षण व विश्लेषण होणार आहे. तसेच, दोन्ही आवक-जावक नोंदवहीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणात इतर तांत्रिक बाजूंचा तपासही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली