चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
तळोदा तालुक्यातील चिनोदा शेतशिवारात बिबट्याने एका दहा वर्षाचा मुलावर हल्ला चढवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे परिसरातील शेतशिवारातील शेतकरी, शेतमजूर, राखणदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, परिसरात बिबटयांचा मुक्तसंचार असतांनाही वनविभागाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
चिनोदा येथील रहिवासी पुण्या जेहर्या पाडवी व त्यांचा नातू कार्तिक राजेश पाडवी हे आपल्या गुरांना चारा काढण्यासाठी गेले असता चारा कापत असता आज दि.१३ ऑगस्ट रोजी अचानक बिबट्याने कार्तिक पाडवी (वय ८) याच्यावर हल्ला केला. बिबटयाने त्याच्या गळा, मान व गालाचा लचका तोडत झुडपात ओढून नेले.
त्यावेळी आजोबा पुण्या पाडवी यांनी पाहिल्याने त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र, बिबट्याच्या या हल्ल्यात कार्तिक पाडवी मृत्युमुखी पडला. सदर घटनेची माहिती मिळताच तळोदा वन विभागाचे कर्मचार्यांकडून घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करण्यात आली.
चिनोदासह परिसरातील शेतशिवारात कुठे ना कुठे शेतकरी, शेतमजूर, राखणदार, ग्रामस्थ यांना बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असतो. दररोज तळोदा तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये बिबटयांचा मुक्तसंचार मोठया प्रमाणावर वाढला आहे.
मात्र, वनविभागाकडून या बिबटयांना जेरबंद करण्याबाबत कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आज बिबटयाच्या हल्ल्यात निष्पाप बालकाचा बळी गेला आहे. यापुर्वीदेखील बिबटयाने प्राण्यांसह मानवांवर हल्ले करुन त्यांना ठार केले आहे. आता तरी वनविभागाने उपाययोजना करुन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.