बोराडी | वार्ताहर
शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथे भरदुपारी घरफोडी करीत ७ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास करणार्या चोरट्याला शिरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून ७ लाख २० हजार रुपये रोख व ४५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथील दौलत हिरालाल राठोड हे दुपारी एक वाजता सेंधवा येथे मुलांचे शालेय वस्तू खरेदीसाठी गेले होते. सायंकाळी घरी परतले तेव्हा घरातील कपटाचे लॉकर उघडे दिसले. त्यातील ७ लाख २० हजारांची रोकड व ४५ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत दौलत राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन तपास पथके तयार करत रवाना केली. यादरम्यान निरीक्षक हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शेमल्या येथील मुकेश शिलेदार पावरा (वय २८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस हिसका दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. तसेच रोकड व दागिने काढून दिले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, रसिक मुल्ला, सुनिल पाठक, संतोष पाटील, राजु दिसले, खसावद, संदिप ठाकरे, भुषण पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, पावरा, दिनकर पवार, सुनिल पवार, सागर कासार यांच्या पथकाने केली.