Tuesday, October 22, 2024
Homeनंदुरबारजिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबाना मिळणार ३ गॅस सिलींडर मोफत

जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबाना मिळणार ३ गॅस सिलींडर मोफत

नंदुरबार | दि.८| प्रतिनिधी

जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत ४ लाखापेक्षा जास्त कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलींडर मोफत मिळणार आहेत. यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेतील १ लाख ५६ हजार २७६ व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील २ लाख ५६ हजार ३१९ असे एकुण ४ लाख १२ हजार ५९५ लाभार्थी आहेत.

- Advertisement -

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सप्टेंबर अखेर गॅस कंपनीत जावून ई केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.

राज्य शासनाने दि.३० जुलै २०२४ रोजी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंमलात आणली आहे. या योजनेत राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

सदर योजनेबाबत आज दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार धनंजय गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली व्ही.सी. द्वारे जिल्ह्यातील एचपीसीएल, आयओसीएल, बीपीसीएल यांच्या सेल्स ऑफिसर यांची आढावा बैठक घेण्यात आली.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षातून ३ गॅस सिलेंडर रिफील मोफत मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी अगोदर स्वखर्चाने गॅस सिलेंडर रिफील करावे व त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाचे गॅस कंपनीकडून अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.

त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेचेी जिल्हयात १ लाख ५६ हजार २७६ तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणे योजनेचे २ लाख ५६ हजार ३१९ असे एकुण ४ लाख १२ हजार ५९५ लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना वर्षातून ८३० रुपयांचे तीन गॅस सिलींडर मोफत मिळणार आहे.

मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांपैकी १ लाख ४ हजार १०८ लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप ५२ हजार १६८ लाभार्थ्यांची ईकेवायसी प्रक्रिया बाकी आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एचपीसीएल कंपनीच्या ८ एजन्सी, आयओसीएल कंपनीच्या १५ एजन्सी, बीपीसीएल कंपनीचे ३ अशा एकूण २६ गॅस एजन्सी आहेत. आजच्या आढावा बैठकीत एचपीसीएल कंपनीचे दीपक आचार्य, आयओसीएल कंपनीचे श्री.वीरेंद्र व बीपीसीएल कंपनीचे श्री.हिमांशु हे उपस्थित होते.

सदर बैठकीत शिल्लक असलेले ईकेवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घेण्याबाबत गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी सूचित केले आहे.

ईकेवायसी प्रक्रिया शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीत जाऊन सप्टेंबर २०२४ अखेर ईकेवायसी पूर्ण करून घ्यावी अन्यथा लाभार्थ्यांना लाभ देण्यास अडचण उ्द्भवू शकते. सदर ईकेवायसी प्रक्रिया लाभार्थ्यांना आपल्या गॅस एजन्सी मार्फत करता येणार असून ते पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.

याबाबत लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या