धुळे । प्रतिनिधी– कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेच्या निषेधार्थ आज मुस्लिम समाजातर्फे शहरातील तिरंगा चौक, 80 फुटी रस्त्यावर रास्तोरोको व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लिम समाजबांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी हातात काळे झेंडे, घोषणांचे फलक हाती घेतले होते.
भ्याड हल्ला करणार्या समाजकंटक, गावगुंडांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्याचे निवेदन आ. फारूख शाह यांनी सहा. पोलिस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांना दिले. या आंदोलनात आ.फारुख शाह, जमाते उलेमाचे हिफजुर रहेमान, गुफरानशेठ पोपटवाले, माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी, माजी नगरसेवक अमीन पटेल, फिरोज लाला, फकरुद्दिन लोहार, युसुफ खाटीक, परवेज शेख, नासिर पठाण, मुक्तार अन्सारी, सईद बेग, आमिर पठाण, डॉ.सर्फराज अन्सारी, इफ्तेकार मुन्ना शेठ, राज चव्हाण, आनंद सैंदाणे, हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे यांच्यासह मुस्लिम समाजातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनामुळे भंगार बाजार, बाराफत्तर चौक येथे शुकशुकाट होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजावर व प्रार्थना स्थळावर अमानुष हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन हे निव्वळ बघ्याची भूमिका घेत होते. निरपराध मुस्लिम महिला-बालके आणि नागरीक जीवाच्या आकांताने ओरडत असतांना प्रशासन फक्त हतबल झालेले निदर्शनास येत होते. बघ्याची भूमिका घेणार्या अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई व्हावी. गजापूर (कोल्हापूर) येथील हिंसाचारातील दोषींना मोक्का लावण्यात यावा, हिंदुत्ववादी समाजकंटकांचा हैदोस चालू असतांना निव्वळ बघ्याची भूमिका घेणार्या अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, बहुसंख्यांकांच्या हिंसाचारातील पीडीत मुस्लिम कुटुंबांना शासनामार्फत तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.