जिल्हा सभेत सर्वानुमते ठराव मंजूर ; जिल्हाध्यक्ष ओबीसी देण्याची मागणी
जळगाव – लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. जिल्हा पदाधिकार्यांनी काम न केल्यामुळे अपयश आले. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा कार्यकारीणीसह सर्व फ्रंटल्सच्या कार्यकारीणी बरखास्त करण्याचा ठराव आज झालेल्या जिल्हा सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ओबीसी नेत्यावर देण्यात यावी अशी सूचना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जिल्हा सभा गुरूवारी आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रसेन्नजीत पाटील (बुलढाणा)हे उपस्थीत होते. जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होंते. तर माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, अरूणभाई गुजराथी, गुलाबराव देवकर जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे,श्रीराम पाटील, वाल्मीक पाटील उपस्थीत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.रवीद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. सतीश पाटलांचे खडे बोल
यावेळी बोलतांना माजी मंत्री डॉ.सतीश पाटील म्हणाले कि, लोकसभेत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. परंतु जळगाव जिल्ह्यांत आपण दोन्ही जागा गमावल्या आहेत.त्या का गमावल्या याचे परीक्षण करण्याची गरज आहे. मात्र आता झाले ते झाले परंतु आगामी विधानसभा निवडणूकीत चांगले यश मिळवीण्यासाठी आपण तयारीला लागले पाहिजे. किमान पाच तरी आमदार आपण पक्षाचे निवडून आणण्याचा निर्धार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातून आमदार देण्याची ग्वाही देऊ- गुजराथी
माजी मंत्री अरूणभाई गुजराथी यावेळी बोलतांना म्हणाले कि, आगामी विधानसभा निवडणूक ही मराठा विरूध्द ओबीसी अशी होणार आहे. त्यामुळे आपण सावध असले पाहिजे. आपण व आपला पक्ष कोणत्याही बाजूने झुकतोय असे वाटता कामा नये. सर्व समाजाला घेवून आपण जात आहोत याची शाश्वती त्यांना आली पाहिजे. शरद पवार यांनी राज्यात सरकार आणण्याची ग्वाही दिली आहे. आपण त्यांना जिल्ह्यातून आमदार देण्याची ग्वाही देवू या असे मतही व्यक्त केले.
कार्यकारिणी बरखास्त
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला जिल्ह्यात अपयश आले आहे. रावेर येथील लोकसभेत पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी काळात चांगले यश मिळवीण्यासाठी व नवीन दमाचे पदाधिकारी देण्यासाठी जिल्हध्यक्षासह विद्यमान कार्यकारीणी बरखास्त करण्यात यावी असा प्रस्ताव डॉ.सतीश पाटील यांनी मांडला.त्याला अनुमोदन देत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सर्व पदाधिकार्यांनी जिल्हा नि रिक्षक प्रसेन्नजीत पाटील यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले. नवीन पदाधिकारी नियुक्त करतांना अध्यक्ष ओबीसी तर उपाध्यक्ष मुस्लीम करण्यात यावा असे मतही त्यानी व्यक्त केले.