Monday, May 4, 2026
Homeक्राईमShrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

आरोपीस पकडताना थरार || स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना घडली. तपासासाठी आलेल्या तळेगाव दाभाडे (जि.पुणे) येथील पोलिसांच्या पथकातून आरोपी जबरीने सोडवण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्वसंरक्षणासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या प्रकाराने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी आयद बाबुलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, वार्ड नं.1, श्रीरामपूर) याचा शोध घेण्यासाठी तळेगाव दाभाडे गुन्हे तपास पथक श्रीरामपुरात आले होते. काल दुपारी 2 वाजता शहर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पथकप्रमुख उप-निरीक्षक मुकेश मोहारे, मुख्य हवालदार अजय सरजिने, संतोष जाधव, हवालदार प्रितम सानप, प्रकाश जाधव, किरण मदने यांच्यासह मदतीसाठी स्थानिक हवालदार सुशिल होलगीर व महिला पोलीस नाईक सविता उंदरे देण्यात आल्या. खासगी वाहनाने हे पथक इराणी गल्ली परिसरात गेले.

आरोपीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने महिला स्टाफसह पथक आत शिरले असता कुटुंबियांनी झडतीस विरोध केला. पोलीस आल्याचे समजताच आरोपी पाठीमागील दरवाजातून पळाला. पोलिसांनी पाठलाग केला असता किरण मदने यांनी कंपाउंडवरून उडी घेत त्याला पकडले. मात्र, आरोपीने प्रतिकार करत पोलिसांशी झटापट सुरू केली. त्याचवेळी गल्लीतील 30 ते 40 जणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. आरोपीने जमावाला उद्देशून पथर फेको इन सालों पे, कुछ नही होगा अशी भडकावू घोषणा देत पोलिसांविरुद्ध दगडफेकीसाठी चिथावणी दिली. जमावातील 5 ते 7 अनोळखी इसमांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून खेचून सोडवण्याचा प्रयत्न केला.

परिस्थिती अधिकच हिंसक होत असताना आरोपीने झेरु बेटा, मार इसकु, ये साले पोलीसवाले कुछ नही करेंगे, असे म्हणत झेरु नावाच्या तरुणास थेट हल्ल्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर 18-19 वर्ष वयोगटातील तरुणांनी हातात लोखंडी कोयता घेऊन शिवीगाळ करत पथकाच्या दिशेने धावला आणि किरण मदने यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मदने यांनी बचावासाठी हात पुढे केल्याने वार त्यांच्या उजव्या मनगटावर बसला, आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातातून रक्तस्त्राव सुरू झाला.

पोलीस पथकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने उपनिरीक्षक मोहारे यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत एक गोळी फायर केली. गोळीबारानंतर जमाव गल्लीबोळातून पळून गेला. स्थानिक पोलीस मदतीसाठी दाखल होताच आरोपीला पुन्हा बळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे हवालदार अजय सरजिने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयद बाबुलाल सय्यद (रा. वार्ड नं.1, इराणी गल्ली, श्रीरामपूर), झेरु (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) जमावातील महिलांसह 5 ते 7 अनोळखी व्यक्तींविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात

पालकमंत्री विखे यांची नाराजी || आयजी-एसपींसोबत बैठक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सिस्पे घोटाळा, त्यासोबत वाढत चाललेले आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, अनाधिकृत कत्तलखाने, ड्रग्ज तस्करी, अवैध वाळू उपसा आणि विविध बेकायदेशीर धंद्यांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे स्पष्ट मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसेच पोलिसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे अत्यावश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

बुधवारी (7 जानेवारी) पोलीस अधीक्षक कार्यालयात पालकमंत्री विखे पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिसिंग व्यवस्थेवर थेट नाराजी व्यक्त केली. विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप केवळ स्थानिक मर्यादेत राहिलेले नाही. सिस्पे घोटाळ्यासह अनेक आर्थिक गैरव्यवहारांचे धागेदोरे मोठ्या नेटवर्कशी जोडलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी ठोस मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. आज, गुरूवारी मुख्यमंत्री फडणवीस नगरमध्ये निवडणूक प्रचारासाठी येत असून, त्यांच्या उपस्थितीत हा विषय गांभीर्याने मांडला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विखे पाटील यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अनाधिकृत कत्तलखान्यांचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. कायदा डावलून सुरू असलेले कत्तलखाने समाजात तणाव निर्माण करत आहेत. त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे, असे सांगताना त्यांनी प्रवरा आणि गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाकडेही लक्ष वेधले. महसूल व पोलीस यंत्रणा असूनही खुलेआम सुरू असलेला वाळू उपसा हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे संकेत त्यांनी दिले. जिल्ह्यात ड्रग्जचे प्रमाण वाढत चालले असून, त्यातून तरूण पिढी उद्धवस्त होत असल्याचा गंभीर आरोपही विखे पाटील यांनी केला. ड्रग्ज, अवैध दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसिंग कमी पडत आहे. गस्त, तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नगर दौर्‍यावर येत असल्याने, विखे पाटील आणि फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा होते, तसेच नगर जिल्ह्यातील पोलिसिंग सुधारण्यासाठी कोणते कठोर निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

बिचुकले

Baramati ByPoll Election 2026: बारामतीत बिचुकले, करुणा शर्मांच्या एकुण मतांपेक्षा ‘नोटा’...

0
बारामती | Baramatiदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे....