धुळे (प्रतिनिधी)- पांझरा नदी व अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याचा येवा वाढत असून दुपारपर्यंत 20 हजारावर क्युसेसे विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे पांझरा नदी दुथडी वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील सावरकर पुतळ्याजवळील पुलावरून दुपारी एका तरूणाने पोहण्यासाठी पांझरेत उडी घेतली. त्यानंतर तो पाण्यात बेपत्ता झाला. याबाबत कळताच देवपूर पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. अमिन पिंजारी असे बेपत्ता तरूणाचे नाव असून तो परिसरातीलच रहिवासी असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणार्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढत असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्प कालपासून विसर्ग सुरू आहे. आज दि.28 रोजी सकाळी 10 वाजता 8800 क्युसेक तर दुपारी 12 वाजता 12100 क्युसेक विसर्ग पांझरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पुढील काही तासांत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
तसेच बुराई मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून धरणात येवा वाढत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून सद्यस्थितीत पाण्याचा विसर्ग सुमारे 3280 क्यूसेक इतका सुरू आहे. हा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पांझरा व बुराई नदी काठच्या नागरीकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.