Thursday, September 19, 2024
Homeधुळेलाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करतांना दक्षता घ्या -जिल्हाधिकारी

लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करतांना दक्षता घ्या -जिल्हाधिकारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; धुळे जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३८ हजार अर्ज प्राप्त

धुळे (प्रतिनिधी) : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतर्ंगत धुळे जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३८ हजार लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या लाभार्थ्यांच्या प्रारुप अर्जांची पडताळणी करतांना विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.

- Advertisement -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज दूरदुष्यप्रणालीद्वारे बैठक संपन्न झाली, यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गणेश मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत  आजपर्यंत २ लाख ३८ हजार महिला लाभार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी केली असून लाभार्थ्यांच्या प्रारुप अर्जांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर लॉगिन आयडी वितरीत केले आहे. या माध्यमातून ऑनलाईन प्राप्त अर्जांवर तालुकास्तरावर लाभार्थ्यांच्या प्रारुप अर्जांची पडताळणी करावी. पडताळणी करतांना लाभार्थ्यांने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याची खात्री करावी. त्याचबरोबर अर्जदारांने सादर केलेले अधिवास प्रमाणपत्र, जन्मदाखला, आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, रेशनकार्ड, उत्पनाचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पडताळणी करावी. अपूर्ण कागदपत्रे असलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी. यासाठी तहसिलदारांनी समन्वय साधावा. तालुकास्तरावर प्रारुप यादीची पडताळणी केल्यानंतर ते अर्ज जिल्हास्तरावरील लॉगिनवर आल्यावर ते विधानसभा मतदारसंघानिहाय तालुकास्तरावर पाठविण्यात येतील. त्यानंतर विधानसभास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर अंतिम निर्णय घेण्यात यावा.

या योजनेचा अधिकाधिक पात्र महिलांना लाभ देण्यासाठी गावपातळीवर, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात प्रत्येक वार्डात जाऊन लाभार्थ्यांची नोंदणी करावी. पंचायत समितीस्तरावर दररोज योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल तालुका व जिल्हास्तरावर पाठविण्यात यावा. ऑफलाईन अर्जांची ऑनलाईन नोंदणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिल्या. बैठकीस सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या