Thursday, September 19, 2024
Homeक्राईमवार गावातील वृध्दाच्या खुनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

वार गावातील वृध्दाच्या खुनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

आजोबांच्या खुनात हात असल्याच्या संशयातून घेतला होता बदला

धुळे | प्रतिनिधी– तालुक्यातील वार येथील वृध्दाच्या निर्घुण खुनप्रकरणी आरोपी ज्ञानेश्‍वर दगडू पवार यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.एम.आहेर यांनी दिला.

- Advertisement -

सन २००६ मध्ये आरोपी ज्ञानेश्वर दगडू पवार- पारधी याचे आजोबा भाईदास उखडू पारधी यांचा खुन झाला होता. या खुनामागे मयत आत्माराम हिरामण पारधी (वय ७० रा. वार ता. धुळे) यांचा हात असल्याचा संशय आरोपी ज्ञानेश्‍वर पवार यांच्या मनात होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी ज्ञानेश्‍वर पवार याने वार गावातील पारधी वाडा कालिका मंदिरात आत्माराम पारधी यांच्यावर बोकड कापण्याच्या सुर्‍याने वार करीत त्यांचा निर्घुण खुन केला. दि.१९ मार्च २०२१ रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत मयताचा मुलगा शांताराम आत्माराम पारधी याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्‍वर पवार याच्याविरुध्द पश्चिम देवपूर पोलिसात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून  न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. त्यानंतर खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधिश-५  डी.एम. आहेर यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदारांची महत्वपूर्ण साक्ष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. अजय सानप यांनी घेतली. त्यात घटनास्थळाचे पंच, हत्यार जप्तीचे पंच, फिर्यादी तथा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टर व तपासी अधिकारी रविंद्र देशमुख यांची साक्ष नोंदविण्यात आली.

सरकार पक्षातर्फे युक्तीवाद ऍड.अजय सानप, यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष व इतर तपासण्यात आलेल्या साक्षीदांराची साक्ष तसेच अभिलेखावर असलेल्या रासायनिक विश्‍लेषनाचे अहवाल व आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद केला.
न्यायाधिश डी. एम. आहेर यांनी खटल्यातील संपुर्ण पुराव्यांचा व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकालांचा विचार करुन आरोपी ज्ञानेश्वर दगडू पवार- पारधी यास भादंवि कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा तसेच १० हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. अजय एस. सानप यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी महिला पोहेकॉ एल. एस.चौधरी व पोलीस नाईक एस. एल. परदेशी यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या