धुळे । प्रतिनिधी – शिरपूरातील शेतकर्यांची कोट्यावधी रुपयांत आर्थिक फसवणूक करीत लुट करणार्या अवैध सावकारास आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. संदिप प्रेमसिंग राजपूत असे त्याचे नाव आहे. त्यांच्याविरोधात कालच शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने शिरपूर शहरासह परिसरातील अनेकांना व्याजाने पैसे देवून त्यांची शेती/जमीन/प्लॉट हे स्वतः व इतरांचे नावे करुन घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
शिरपूर येथील रथगल्लीत राहणारे अजितसिंग नवनीतसिंग राजपूत (वय 63) या शेतकर्याने कंपवाताचे आजाराचे उपचारासाठी संदीप प्रेमसिंग जमादार/राजपूत (वय-41 रा. प्लॉट नं. 7, सिध्दीविनायक कॉलनी शिरपूर) याच्याकडून मार्च 2017 मध्ये 30 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबाबत आपसात समजूतीचा लेख करुन घेतला होता. या 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात 90 लाख 53 हजार रुपये किंमतीची अजितसिंग यांची शिरपूर शिवारातील सर्वे नं. 35/2 क्षेत्र 1 हे.21 आर, 0.41 आर, 0.27 आर शेती त्याच्या नावे करुन दिली. तसेच शेती सोडविण्यासाठी त्यास वेळोवेळी 1 कोटी 21 लाख 6 हजार रुपये रोख व वेळोवेळी 16 लाख 64 हजार 200 रुपये रोख असे व्याजासहित एकूण 1 कोटी 37 लाख 70 हजार 200 रुपये संदीप जमादार यास रोख स्वरुपात परत केले. मात्र तरी देखील तो अजूनही तक्रारदाराकडे पैशांची मागणी करीत असून पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या मुलाला शिरपूरमध्ये जिवंत राहू देणार नाही. तुम्हाला मारुन टाकू व तंगडया तोडून टाकू, अशी धमकी देतोय. त्यास तक्रारदार अजितसिंग हे हिशोब समजविण्यासाठी गेले असता त्याने शिवीगाळ करीत अंगावर येतो, धक्काबुक्की करतो. गायब करुन टाकू, अशी धमकी देवून शाररिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक करीत आहे. त्याने अद्यापही तक्रारदार याची शेती परत न करता आर्थिक फसवणूक केली आहे. त्यानुसार त्यांच्याविरोधात काल भारतीय न्याय संहिता 2023 कलम- 316(2), 318(4), 336(2) (3), 338, 340 (2), 351(2) (3), 352, सह महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-2014 चे. कलम 39 प्रमाणे शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर पथकाने गुन्हयातील मुख्य आरोपी संदिप प्रेमसिंग जमादार यास काल दि. 15 रोजी रात्री शिरपूर शहरातून ताब्यात घेत अटक केली. तसेच त्याच्या सावकारी व्यवसायाबद्दल माहिती काढली असता त्याच्याकडे सावकारी व्यवसायाबाबतचे कोणतेही अधिकृत लायसन नसून त्याने तक्रारदारास यापूर्वी दाखवलेले सावकारीचे लायसन हे बनावट आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर तसेच पोसई अमोल देवढे, असई हिरालाल ठाकरे, गयासुद्यीन शेख, पोहवा श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार, विलास पाटील यांच्या पथकाने केली.