यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान देशाची राजधानी दिल्ली येथे होणार आहे. सात दशकानंतर दिल्लीत साहित्य संमेलन होत असून, सरहद संस्थेला आयोजनाचा मान मिळाला आहे. संमेलन अध्यक्षपदाचा सन्मान कोणत्या विभूतीला मिळणार याची उत्सुकता मराठी साहित्य सारस्वतातील साहित्यिक आणि जगभरातील मराठी भाषाप्रेमींना अनेक दिवसांपासून होती. ती प्रतीक्षा रविवारी संपुष्टात आली. लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत डॉ. भवाळकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. डॉ. भवाळकर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा महामंडळ अध्यक्षांनी केली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावे चर्चेत होती, पण ती सर्व मागे पडली. संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळालेल्या डॉ. भवाळकर सहाव्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत. याआधी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष आणि डॉ. अरुणा ढेरे यांना हा सन्मान मिळाला आहे. डॉ. भवाळकर यांची निवड नाशिककरांसाठीसुद्धा आनंददायी म्हटली पाहिजे. कारण नाशिक त्यांचे आजोळ आहे. वर्षातून किमान दोनदा त्या नाशिकला येतात, असे त्यांनी नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनावेळी सांगितले होते.
पूर्वी संमेलन अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीचा खेळ खेळला जात असे. निवडणुकीत दोन-तीन उमेदवार उभे राहत. साहित्य महामंडळाचे सभासद मतदान करून संमेलनाध्यक्षांची निवड करीत. निवडणुकीमुळे संमेलनाध्यक्ष निवडीला राजकीय रंग चढू लागला होता. त्यातून गट-तट निर्माण होत. साहित्यिकांत काहीशी कटूता निर्माण होत असे. निवडणूक प्रक्रिया मान्य नसलेले अनेक ज्येष्ठ साहित्यिक निवडणुकीपासून चार हात दूर राहणे पसंत करीत. संमेलनाध्यक्षांची निवड ही निवडणूक घेऊन न करता सर्वसंमतीने आणि सन्मानाने व्हावी, अशी आग्रही मागणी साहित्य क्षेत्रातून अनेक वर्षे केली जात होती. ही मागणी विलंबाने का होईना; साहित्य महामंडळाने मान्य केली. त्यासाठी 2018 मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली. 92 व्या साहित्य संमेलनापासून निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरली. अध्यक्ष निवड सन्मानाने करण्याचा नवा पायंडा अनुसरला गेला.
राजकीय वळणाने जाणार्या अध्यक्ष निवडीची निवडणुकीच्या अनिष्ट चक्रातून एकदाची सुटका झाली. डॉ. भवाळकर यांची निवड करून साहित्य महामंडळाने नवरात्रोत्सवाच्या मांगल्यपूर्ण वातावरणात नारीशक्तीचा सन्मानच केला आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत बरीच वाढ झाली आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, महिलांचा सन्मान जपला जात नाही, असे बोलले जात असून निराशादायी चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. भवाळकर यांची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड औचित्यपूर्ण ठरते. वयाची आठ दशके पूर्ण करणार्या डॉ. भवाळकर आजही लेखनाबरोबरच समाज माध्यमांतही सक्रिय आहेत. त्यांची सक्रियता केवळ तरुण साहित्यिकच नव्हे तर समाजातील समग्र तरुणाईला प्रेरणादायी आहे. अनेक वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे विपुल लेखन करून त्यांनी मराठी साहित्याची भरीव सेवा केली आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङमयकोश तसेच मराठी ग्रंथकोश निर्मिती कार्यातही योगदान दिले. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद एक महिलाच भूषवत आहे. महामंडळ अध्यक्ष आणि संमेलन अध्यक्ष महिलाच व्हाव्यात हा दुर्मिळ योग साहित्य विश्वात प्रथमच जुळून आला आहे. महिला मनांना तो आत्मबळ देणारा ठरावा. ‘डॉ. भवाळकर यांचे मराठी साहित्यातील योगदान आजवर काहीसे दुर्लक्षित राहिले.
मात्र, संमेलन अध्यक्षपदी झालेल्या निवडीतून त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मान होत आहे’ अशा भावना साहित्य महामंडळ अध्यक्षा प्रा.उषा तांबे यांनी व्यक्त केल्या. ‘माझ्यापूर्वी आणि माझ्याबरोबर अनेक जण या सन्मानासाठी पात्र होते आणि आहेत. त्या सर्वांच्या सदिच्छांसोबत हा बहुमान मी नम्रपणे स्वीकारते’अशी प्रतिक्रिया डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली. त्या प्रतिक्रियेतून त्यांची विनयशीलता प्रकट होते. मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्या आनंदात मराठीजगत न्हाऊन निघाले असताना डॉ. भवाळकर यांना संमेलनाध्यक्षपदाचा मान देऊन साहित्य महामंडळाने मराठी साहित्याचे थोरपण जपले आहे. डॉ. भवाळकर यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळातून सहर्ष स्वागत होत आहे. दैनिक ‘देशदूत’ कडून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!