नंदुरबार | दि.२९| प्रतिनिधी
सिसा ता.धडगाव येथे कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसतांना वैद्यकीय व्यवसाय करणार्या बोगस डॉक्टराविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिसा येथील ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी व तहसिलदारांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरुन संबंधीतांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सिसा ता.धडगाव येथे कोणत्याही प्रकारचे वैेद्यकीय शिक्षण न घेता बोगस डॉक्टराकडून लोकांवर उपचार करण्यात येवून त्यांची फसवणूक करण्यात येत होती.
या बोगस डॉक्टरावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी तालुका वैद्यकीय अधिकारी व तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.
त्यानुसार संबंधीत बोगस डॉक्टराविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.२७ जून रोजी सिसा (ता.धडगाव) येथील राजा इरमा ठाकरे व दिनेश राजा पाडवी यांच्या मालकिच्या घरात बोगस डॉक्टर रिदय देवनाथ विश्वास (रा.सबदालपुर अरंगघाटा नारंणपूर पो. अरंगघाटा जि.नाडीया (वेस्ट बंगाल) पिन नं. ७४१५०१ ह.मु. सिसा ता. धडगाव जि. नंदुरबार) हा कुठलेही वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र नसतांना अथवा डिग्री नसतांना बेकायदेशिररित्या वैद्यकीय व्यवसाय करतांना मिळून आला.
सदर बोगस डॉक्टर लोकांची फसवणूक करुन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेत होता. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिदय देवनाथ विश्वास या बोगस डॉक्टराविरुद्ध भादंवि कलम ४२० सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ३३, ३३ (ए), ३५, ३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहेत.