Friday, June 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजए.आय. तंत्रज्ञानासह एसटीच्या ताफ्यात 'स्मार्ट बस' येणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ए.आय. तंत्रज्ञानासह एसटीच्या ताफ्यात ‘स्मार्ट बस’ येणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

एसटी प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ‘स्मार्ट बसेस ‘ लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दिली.

- Advertisement -

एसटीच्या ताफ्यात लवकरच नव्या तीन हजार बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत बोलताना सरनाईक यांनी स्मार्ट बसविषयी माहिती दिली. नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेस मध्ये ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी.पी.एस. तंत्रज्ञान, एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अ‍ॅनालाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञान वर आधारित बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.

स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक आणि परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

नवीन बसेस मध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती बरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडी बाबत “अपडेट” राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूस जाहिरात, प्रसिद्धीसाठी एलईडी पॅनल लावण्यात येणार आहेत. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे, असे सरनाईक म्हणाले.

सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोमबेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार असून बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तात्काळ विझवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि संबंधित खाते प्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा सुरक्षिततेबरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणे, तसेच बस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवणे यासाठी देखील मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात खऱ्या अर्थाने एसटी स्मार्ट होईल’
प्रताप सरनाईक,परिवहन मंत्री

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...