Sunday, September 8, 2024
Homeधुळेहातमजूराकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस जप्त

हातमजूराकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस जप्त

सत्रसेनच्या मित्राकडून खरेदी केल्याची कबुली; एलसीबीची कारवाई  

धुळे (प्रतिनिधी) : शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवरील हॉटेल देश-विदेश जवळून बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील हातमजुराला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दुचाकी, गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस असा ७७ हजाराचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेला गुप्त माहितीच्या आधारे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार एलसीबीचे पथक हॉटेल देश-विदेश जवळ गेले असता तेथे एक जण संशयीतरित्या दुचाकीसह उभा दिसला. त्यास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळण्याचा प्रयत्न करत असतांना त्याला पथकाने पकडले. त्याने त्याचे नाव किशोर राजेंद्र लोणे (वय २४ रा. पिंपरी पो. गणेशपुर, ता.चाळीसगाव, जि.जळगाव) असे सांगितले. पिस्टलबाबत विचारपूस केली असता त्याने उजव्या बाजुला पॅन्टच्या आत कमरेला लावलेले पिस्टल (गावठी कट्टा) काढुन दिला. पिस्टलच्या मॅगझीनमध्ये दोन काडतुस दिसुन आले.

- Advertisement -

पथकाने त्यास परवान्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. तो बेकायदेशीररित्या  पिस्टल बाळगत असल्याची खात्री झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्याकडून २५ हजारांचे एक गावठी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा), दोन हजार रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुसे, ५० हजाराची एम.एच. १९ डी.एक्स. ५९४४ क्रमांकाची दुचाकी असा एकुण ७७ हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. चौकशीत  किशोर लोणे याने हा गावठी कट्टा हा त्याचा मित्र नाना पुर्ण नाव माहित नाही (रा. सत्रसेन ता.शिरपुर) याच्याकडुन खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोकॉ किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून संबधीतांविरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात  भारतीय शस्त्र अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई अमरजित मोरे, असई संजय पाटील, श्याम निकम, पोहेकॉ संदीप सरग, संतोष हिरे, संदीप पाटील, मायुस सोनवणे, तुषार सुर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या