नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील यल्लापूर तालुक्यातील गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. ज्यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले.
तसेच, अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजीमंडईत जात होते. या ट्रकमधून २५ जण प्रवास करत होते. या अपघातात १५ जखमी झाले असून जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर कन्नड पोलीस अधीक्षक एम. नारायण यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, “पहाटे ४ वाजताच्या सुमारास ट्रक चालक दुसऱ्या वाहनाला साइड देताना डाव्या बाजूला वळला आणि जवळपास ५० मीटर खोल दरीत पडला. घाटातील या रस्त्यावर सुरक्षा भिंत नाही. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आणि १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा