नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अग्निवीर योजना जाहीर केल्यापासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विरोधकांकडून सातत्याने या योजनेवर टीका केली जात आहे. याचे पडसाद लोकसभेत देखील बघायला मिळाले आहेत. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी अग्निवीर जवानांसाठी मोठी घोषणा केली आहे.
माजी अग्नीवीरांना निमलष्करी दलात १०% आरक्षण दिले जाणार आहे. यासोबतच त्यांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीतूनही सूट मिळणार आहे. आतापर्यंत, CISF, BSF आणि CRPF आणि सशस्त्र सीमा बलच्या प्रमुखांनी माजी अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केले आहे.
यासंदर्भात बोलताना, सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल म्हणाले, सीआरपीएफमध्ये माजी अग्निवीरांच्या भरती प्रकिक्रयेसंदर्भातील सर्व व्यवस्था झाली आहे. माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाणार आहे. तसेच त्यांनी शारीरिक चाचणीतदेखील सूट दिली जाणार आहे. याशिवाय सीआयएसएफनेही यासंदर्भात सर्व तयारी केली असल्याची माहिती सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांनी दिली आहे.
यासंदर्भात बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. माजी अग्निवीर जवानांकडे चार वर्षांचा अनुभव असेल, तसेच ते प्रशिक्षित असतील. बीएसएफसाठी हे फायद्याचं ठरेल. असे ते म्हणाले. तसेच रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबल पदाच्या सर्व भरतींमध्ये माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण असेल, अशी प्रतिक्रिया आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी दिली.
वयोमर्यादेत अशी असणार सुट
सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये माजी अग्निशमन दलाला आरक्षण मिळणार आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये, सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे, ओबीसीसाठी १८ ते २६ वर्षे आणि एससी – एसटी साठी २८ वर्षे आहे. पहिल्या तुकडीत सीआयएसएफ मध्ये भरतीसाठी पाच वर्षांची सूट असेल. त्यामुळे सामान्य श्रेणीसाठी २८ वर्षे, ओबीसीसाठी ३१ वर्षे आणि एससी-एसटीसाठी ३३ वर्षे असतील. दुसऱ्या बॅचमध्ये तीन वर्षांची शिथिलता असेल. यानुसार वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६ वर्षे, ओबीसीसाठी २९ वर्षे आणि एससी-एसटीसाठी ३१ वर्षे असेल.
अग्निवीर योजना काय आहे?
भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी दिली जाते. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) त्यांना समाविष्ट केले जाते. तसेच त्यांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) दिले जाते. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागते. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये दिले जातात. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना कामगिरीच्या आधारे स्थायी सेवेत दाखल केले जाते. प्रत्येक तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना या पद्धतीने स्थायी सेवेत स्थान देण्यात येते.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा