मुंबई | Mumbai
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अर्थात सीबीएसईने २०२६ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा (Exam) वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर आज (बुधवार) याबाबतचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे.
सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेचा (SSC Exam) पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मे मध्ये होणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांना (Student) त्यांचे गुण सुधारण्याची एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पहिल्या टप्प्यात कमी असेल तर त्याला दुसऱ्या टप्प्यात बसून चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असणार आहे तर दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे. तर पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परिक्षेचा निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा निकाल (Result) जूनमध्ये लागणार असल्याची देखील माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. तर अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच होणार असल्याचे सीबीएसईकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सीबीएसईच्या माहितीनुसार, वर्षातून दोनदा होणारी इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. मात्र, संबंधित विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन फक्त एकदाच घेतले जाईल. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. मात्र, या सुविधेसाठी विद्यार्थ्यांना अधिक परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.




