राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
पोलीस प्रशासनाच्या 112 नंबरवर फोन करुन राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथे गोळीबार झाल्याची माहिती देण्यात आली. पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने खोटी माहिती देणार्या तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांची सुरुक्षा व तातडीने मदत करण्याच्या हेतूने पोलिस प्रशासनाकडून 112 नंबरची सुविधा सुरु आहे. मात्र काही टारगट तरुणाकडून 112 नंबरवर खोटी माहिती देऊन पोलीस कर्मचार्यांना त्रास देण्याच्या घटना समोर येत आहे. राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथील महेश घाडगे याने दि. 13 जून रोजी पहाटे दिड वाजे दरम्यान 112 नंबरवर वेळोवेळी फोन करुन सांगीतले, अनिल देशमुख नावाचा व्यक्ती अवैध दारु विक्री करत आहे.
आणि अवैध बंदूक दाखवून त्याने एके 47 या बंदुकीतून माझ्यावर गोळीबार करुन माझी हत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या हाताला गोळी चाटून गेली. मी देखील त्याच्यावर गोळीबार केला. अशी माहिती दिली. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आसिफ शेख, हवालदार प्रवीण आहिरे, लक्ष्मण खेडकर, चालक जालिंदर साखरे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने आरोपी महेश घाडगे याला फोन करुन माहिती विचारली मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपीने दोन तीन वेळा 112 नंबरवर फोन करुन चुकीची माहिती देऊन रात्रभर पोलिस पथकाला त्रास दिला.
नंतर पोलिस पथकाने गुप्त खबर्या मार्फत आरोपीचा शोध घेतला. पोलिस पथकाने आरोपी महेश घाडगे याला मध्यरात्री त्याच्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस नाईक प्रविण गुलाबराव आहिरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश बाळासाहेब घाडगे, वय 33, रा. घोरपडवाडी ता. राहुरी, याच्यावर गु.र.नं. 701/2024 भादंवि 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश सानप हे करीत आहे.